93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीला गुजरातमधून मुंबईत आणणार; खटल्याला गती मिळणार

1993 मध्ये मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफ अब्दुल हलारी याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष टाडा न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. हलारीला गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहातून मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात स्थलांतरित करण्याचे आदेश विशेष टाडा न्यायालयाने दिले आहेत. हलारीला मुंबईला हलवण्याची मागणी सीबीआयने केली होती. टाडा न्यायालयाने ही मागणी मान्य केल्यामुळे 93 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

हलारी सध्या साबरमती कारागृहात कैद असून त्याला तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुंबई न्यायालयातील सुनावणीला हजर केले जाते. मात्र यादरम्यान तांत्रिक अडचण येत असल्याने हलारीला आर्थर रोड कारागृहात हलवण्यात यावे, अशी मागणी करीत सीबीआयने विशेष टाडा न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर हलारीच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला होता. विशेष टाडा न्यायाधीश व्ही. डी. केदार यांनी दोन्हीकडील युक्तीवाद सविस्तरपणे ऐकून घेतल्यानंतर सीबीआयची मागणी मान्य केली.

विशेष टाडा न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात साक्षी-पुरावे नोंदवून घेण्यासाठी हलारीच्या प्रत्यक्ष हजेरीचे आदेश दिले. साबरमती कारागृहाच्या अधिक्षकांना हे आदेश दिले आहेत.

मुंबईत 12 मार्च 1993 रोजी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. त्यात 257 निरापराधी लोकांना प्राण गमवावा लागला होता, तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी झाल्याप्रकरणी हलारीला 29 फेब्रुवारी 2020 रोजी अटक करण्यात आली होती. सध्या हलारी साबरमती कारागृहात आहे, तर इतर 6 आरोपी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत.