
स्टिरॉईड आयड्रॉपचा दीर्घकाळ वापर डोळ्यांसाठी अत्यंत हानीकारक आहे. स्टिरॉईड आयड्रॉपच्या सततच्या वापराने काचबिंदू (ग्लुकोमा) होतो. अवघ्या 10 वर्षांच्या मुलांनाही काचबिंदू झाल्याचे निष्पन्न झालंय. यातील बरेचसे रुग्ण काचबिंदू वाढल्यानंतर उपचारासाठी डॉक्टरांकडे जातात, पण तोपर्यंत खूप उशीर होतो. त्यामुळे तज्ञांच्या देखरेखीखालीच स्टिरॉईड आयड्रॉप वापरावेत.
एम्सच्या आरपी सेंटर फॉर ऑप्थॅल्मिक सायन्सेसमधील काचबिंदू युनिटचे प्रभारी प्राध्यापक डॉ. तनुज दादा यांनी सांगितले की, स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर काचबिंदूमुळे अंधत्व आणू शकतो. आयड्रॉप, त्वचेची क्रीम, इनहेलर, गोळ्या आणि इंजेक्शन अशा विविध स्वरूपात वापरले जाणारे स्टिरॉइड्स डोळ्यांच्या आतील दाब वाढवू शकतात. त्यामुळे ऑप्टिक नर्व्हचे नुकसान होते.
एम्स आरपी सेंटरमध्ये दर महिन्याला राजस्थान, हरयाणा यांसारख्या शुष्क प्रदेशातील 10-15 वर्षे वयोगटातील मुलांना काचबिंदू झाल्याचे दिसून येते, असे डॉ. तनुज दादा म्हणाले. दमा, फुप्फुसांच्या दीर्घकालीन आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या इनहेलरमुळे डोळ्यांचा दाब वाढण्याची शक्यता असते.