
येत्या 30 जूनपासून कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात होणार आहे, परंतु मानसरोवर यात्रा या वर्षी भाविकांसाठी खर्चिक असणार आहे. चीनने त्यांच्या भूभागावरील कैलास यात्रेचे शुल्क वाढवले असून चीन प्रति यात्रेकरू 17 ते 20 हजार रुपयांपर्यंत जास्त शुल्क घेत आहे. त्यामुळे 2019 च्या तुलनेत भाविकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. दोन मार्गांतून कैलास यात्रा केली जाते. पहिला मार्ग म्हणजे उत्तराखंडमधील लिपुलेख मार्ग आणि दुसरा सिक्कीममधील नाथुला पास. चीन सीमेपर्यंत पहिल्यांदाच दोन्ही मार्गांनी प्रवास गाड्यांमधून होईल. लिपुलेखमार्गे यात्रेसाठी प्रति व्यक्ती 1.84 लाख रुपये खर्च येईल, पण यापैकी 1100 डॉलर म्हणजेच सुमारे 95 हजार रुपये चीनची फी असेल. 2019 मध्ये 1.30 लाख रुपयांच्या खर्चात 900 डॉलर म्हणजे 77 हजार रुपये प्रति यात्रेकरू चीनने घेतले होते.
याआधी लिपुलेखमार्गे कैलास यात्रेसाठी 20 ते 21 दिवस लागत होते, परंतु आता 23 दिवस लागतील. याचे कारण म्हणजे प्रवाशांचे दिल्लीत 12 दिवस वास्तव्य असणार आहे, तर फक्त नऊ दिवस तिबेटमध्ये जाणार आहेत. पूर्वी दिल्लीत एका दिवसात कागदपत्रांची तपासणी केली जात होती. त्यानंतर पिथौरागडला पोहोचल्यावर धारचुला, पांगू, गुंजी येथे आरोग्य तपासणी होत असायची, परंतु 2025 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीत तीन दिवस आरोग्य व कागदपत्र तपासणीसाठी ठेवले आहेत.
- कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्यांसाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत. अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक आहे. पासपोर्टची वैधता किमान 6 महिने असावी. 1 जानेवारी 2025 रोजी अर्जदाराचे वय किमान 18 ते 70 वर्षे असायला हवे.
- अर्जदाराच्या बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे. प्रवासासाठी वैद्यकीय चाचणी सर्वात महत्त्वाची आहे.