
हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंडसह पूर्व आशियात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्या वाढत असून सिंगापूरमध्ये 1 मे ते 19 मेदरम्यान 3 हजार कोरोना रुग्ण आढळले. एप्रिलच्या अखेरीपर्यंत ही संख्या 11 हजार 100 होती त्यात 28 टक्क्यांची वाढ झाली असून सध्या येथील रुग्णांची संख्या 14 हजार 200वर गेली आहे. तर हाँगकाँगमध्ये चाचण्यांचे प्रमाण 12.66 टक्क्यांवर पोहोचले आहे.
सिंगापूरमध्ये नवा व्हेरियंट
सध्या सिंगापूरमध्ये एलएफ.7 आणि एनबी.1.8 या कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटचा प्रसार होत आहे. हे दोन्ही प्रकार जेएन.1 स्ट्रेनशी संबंधित असून त्यांनी दोन तृतीयांशहून अधिक नागरिक संक्रमित झाले आहेत.
जेएन1 रोगप्रतिकार शक्ती कमी करतो
जेएन1 ओमिक्रॉनच्या बीए 2.86चा एक स्ट्रेन आहे. हा व्हेरियंट 2023मध्ये पहिल्यांदा आढळला होता. यात 30 म्युटेशन्स असून ते रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करतात. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिंस युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार जेएन1 आधीच्या कोरोना व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने पसरतो. परंतु, तो धोकादायक नाही. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरियंटला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट घोषित केले होते.