
शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध पाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केला. मंगळवारी रात्री वान्लेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या फ्लॅटवर ही संतापजनक घटना घडली. याची माहिती मिळताच, विश्रामबाग पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. यातील दोन तरुण पीडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून, तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे.
विनय विश्वेश पाटील (22), सर्वज्ञ संतोष गायकवाड (20), तन्मय सुकुमार पेडणेकर (21) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. पीडित तरुणी ही मूळची बेळगाव जिल्ह्यातील असून, सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. पीडित तरुणी आणि संशयित पाटील, गायकवाड हे त्याच महाविद्यालयात शिकत आहेत. मंगळवारी रात्री या तिघांनी तरुणीला चित्रपट पाहण्यासाठी जाऊ, असे सांगून मोपेडवरून वान्लेसवाडी येथील त्यांच्या फ्लॅटवर नेले. तेथे त्यांनी तरुणीला गुंगीचे औषध टाकून ड्रिंक पाजले. त्यानंतर तरुणीवर तिघांनी बलात्कार केला. काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर मध्यरात्री विश्रामबाग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.