Pahalgam Attack : ज्यांच्या कपाळाचं कुंकू हिसकावलं गेलं, त्या महिलांमध्ये योद्ध्याची भावना-उत्साह नव्हता; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

हरियाणाचे भाजप राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा यांनी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पती गमावलेल्या महिलांबाबत अत्यंत निंदनीय आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, “ज्या महिलांचं कपाळाचं कुंकू हिसकावलं गेलं, त्यांच्यात योद्ध्यासारखा उत्साह आणि जोश नव्हता. म्हणूनच 26 लोकांचा गोळीबारात बळी गेला.” या वक्तव्यानंतर जांगडा यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका होत आहे.

काँग्रेसने यावर टीका करत रामचंद्र जांगडा यांचं हे वक्तव्य अत्यंत निंदनीय आणि असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. शनिवारी भिवानी येथील पंचायत भवनात आयोजित अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी स्मृति अभियान जिल्हा चर्चासत्र कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याचाच व्हिडीओ X वर पोस्ट करत काँग्रेसने भाजपला दोन प्रश्न विचारले आहेत की, भाजप त्यांच्या खासदाराच्या या वक्तव्याशी सहमत आहे का? या लज्जास्पद वक्तव्यावर भाजप काही कठोर कारवाई करेल की खासदाराला वाचवेल? जर या खासदारावर कारवाई झाली नाही तर हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले जाईल, असंही काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.