
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी 30 मे 2025 रोजी उत्तीर्ण होणार आहे. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा 17 महिला कॅडेट्स एनडीएमधून पदवी मिळवतील. त्यानंतर त्या हिंदुस्थानी लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होऊन देशाची सेवा करतील. 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने महिलांना एनडीए परीक्षा देण्याची परवानगी देण्याचा आदेश दिल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने महिलांना अर्ज करण्याची परवानगी दिली. 2022 मध्ये पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्सची तुकडी एनडीएमध्ये सामील झाली होती. 2022 मध्ये महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीच्या प्रवेशानंतर आतापर्यंत 126 महिलांना एनडीएमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यापैकी 121 सध्या प्रशिक्षण घेत आहेत. तर पाच कॅडेट्सनी राजीनामा दिला आहे. संसदेत दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानी सैन्यात जवळास 12 लाख पुरुष आहेत, तर महिलांची संख्या केवळ 7 हजार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण फक्त 0.56 टक्के इतके आहे. हवाई दलात 1.5 लाख जवान आहेत. महिलांची संख्या फक्त 1600 आहे. येथे हे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षा थोडे जास्त आहे. याशिवाय, हिंदुस्थानी नौदलात पुरुषांची संख्या दहा हजार आहे, तर महिलांची संख्या फक्त 700 आहे. या दलात महिलांचे प्रमाण 6.5 आहे.
9,118 महिला अधिकारी
हिंदुस्थानच्या तिन्ही सशस्त्र दलात एकूण 9 हजार 118 महिला अधिकारी आहेत. महिला लढाऊ विमाने उडवण्यात आणि समुद्रात लष्करी जहाजांवर महत्त्वाच्या जबाबदाया हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, तसेच विशेष ऑपरेशन्सद्वारे शत्रूला धडा शिकवत आहेत. बहुतेक महिला नौदलात काम करत आहेत. नौदलाच्या एकूण संख्येत महिलांचे प्रमाण सुमारे 6.5 टक्के आहे.
महाराष्ट्रातील 11 महिला कॅडेट्स
देशातील 17 राज्यांमधून 121 महिला कॅडेट्स आहेत. हरियाणामध्ये सर्वाधिक 35 महिला कॅडेट्स आहेत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातून 28, राजस्थानातून 13 आणि महाराष्ट्रातून 11 महिला कॅडेट्स आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये, कर्नाटक राज्यातून केवळ एक महिला कॅडेट्स आहे. केरळमधील चार कॅडेट एनडीएमध्ये सामील झाल्या आहेत. अकादमीतून बाहेर पडणाऱ्या पाच कॅडेट्स हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या आहेत.