
गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह- इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या समीक्षा उर्फ सानिका भारत नरसिंगे (23, रा.जयभवानी गल्ली,कसबा बावडा) या विवाहितेने वारंवार लग्नास दिल्याने,तिचा खुन करून, पळून गेलेल्या सतीश मारुती यादव (25,मूळ रा.उंड्री,ता. पन्हाळा,सध्या रा.शिवाजीपेठ,कोल्हापूर) याने आज सकाळी शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे-कातळापुडी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,समीक्षा ही आई आणि लहान बहीण व भावासोबत राहत होती. 2018 मध्ये लक्षतीर्थ वसाहत परिसरातील एका तरुणासोबत तिचे लग्न झाले होते. नवऱ्याशी पटत नसल्याने, तीन महिन्यांतच ती नवऱ्याला सोडून, माहेरी आली. इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करताना, तिची ओळख कोल्हापुरात कामानिमित्त आलेल्या तेलंगणा येथील तरुणी आयशू आंम्पले आणि संशयित आरोपी सतिश यादव यांच्याशी झाली. दोघे ही तीन महिन्यांपासून सरनोबतवाडी येथील भाडेकरारावरील एका टू बीएचके फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. सोबत तिची मैत्रीण आयशु देखील राहत होती. पण गेल्या महिन्याभरापासून समीक्षा आणि सतिश यांच्यात वारंवार वाद होत असल्याने, समीक्षा आपल्या मैत्रिणी सोबत कसबा बावडा येथील घरी राहण्यास आली होती.
मंगळवारी दुपारी समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू दोघी जणी त्यांचे साहित्य आणण्यासाठी फ्लॅटवर आले होते. याची माहिती मिळताच सतीश यादवही फ्लॅटवर आला. यावेळी रागाच्या भरात त्याने समीक्षाच्या छातीत चाकूने वार करून, फ्लॅटला बाहेरून कडी लावून पळून गेला. यावेळी आयशूने मित्राला फोन करून, फ्लॅटला बाहेरून लावलेली कडी काढयला सांगितली. त्यानंतर हा खुनाचा खळबळजनक प्रकार समोर आला.
या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पो.नि.श्रीराम कन्हेरकर पोलिस फौजफाटा घेऊन रुग्णालयात दाखल झाले. तसेच करवीर पोलीस ठाणे, गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होत. गांधीनगर चे पो.नि.अनिल तनपुरे यांच्या नेतृत्वात पाच वेगवेगळ्या पथकाकडून संशयित आरोपीचा शोध सुरू होता. खून करुन पळून गेलेल्या सतीश यादवच्या शोधासाठी त्याच्या शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर येथील रूमसह मित्रांकडे छापे टाकण्यात आले होते. पण तो सापडला नाही.
दरम्यान त्याचा अधिक तपास सुरू असताना,पोलिसांना हा संशयत आरोपी शाहूवाडी परिसरात असल्याचे माहिती मिळाली. आज पोलिसांचे पथक पोहोचेपर्यंत संशयित सतीश यादव याने शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे- कातळापुडी येथे माळरानावर गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलिसांकडून मृतदेह मलकापूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवून, उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकाकडे देण्याची तयारी सुरू होती.































































