
कळवण तालुक्यातील मानूर शिवारात कोल्हापूर फाटा येथे बुधवारी रात्री चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार बंगल्याच्या बीमवर धडकली. यात कारमधील सहा जणांनी प्राण गमावले असून एक गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये आई, विवाहित मुलगी, दोन नातवांचा समावेश आहे.
नाशिक येथील लग्न सोहळ्याला हजेरी लावून सटाणा तालुक्यातील नामपूर येथील भदाण कुटुंबीय गावी परतत होते. दरम्यान, त्यांची आय-10 कार नाशिक-कळवण रस्त्यावर कोल्हापूर फाटा येथे पोहोचली तेव्हा रात्री सवादहाच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कार विठोबा आहेर यांच्या बंगल्यावर आदळली. बीमच्या धडकेने कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या आवाजामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून नामपूर येथील शैला वसंत भदान (65), त्यांच्या जाऊ प्रतीक्षा भालचंद्र भदान (50), चालक सगीर मेहबूब पठाण (67), शैला यांची मुलगी देवळा येथील माधवी योगेश मेतकर (30), नात त्रिशा योगेश मेतकर (3) यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी उत्कर्ष मेतकर (12), भालचंद्र मधुकर भदान (65) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथे हलवण्यात आले. मात्र वाटेतच उत्कर्षचा मृत्यू झाला. भालचंद्र यांच्यावर उपचार सुरू आहेत. सहाजणांच्या मृत्यूने नामपूर व देवळा शहरावर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे तपास करीत आहेत.