RBI चा मोठा दिलासा; रेपो रेटमध्ये 0.50 टक्के कपात, कर्ज स्वस्त होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो रेट 6 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर आला असून याचा थेट फायदा कर्जधारकांना होणार आहे. रेपो रेटमध्ये कपात केल्याने गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची आशा आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली पतधोरण आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये रेपो रेटमध्ये 0.50 टक्के कपात करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात 0.25 टक्के आणि एप्रिल महिन्यात 0.25 टक्के अशी कपात करण्यात आली होती. आता यात 0.50 टक्के कपात करण्यात आली आहे. याचाच अर्थ गेल्या सहा महिन्यात रेपो रेटमध्ये 1 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे गृहकर्जदारांचा मासिक हप्ता कमी होणार आहे.

तुमचा ईएमआय किती कमी होणार?

दरम्यान, रेपो रेटमध्ये कपात केली असली तरी प्रत्येकालाच आपला ईएमआय किती कमी होणार हे जाणून घ्यायचे असते. अर्थात ईएमआय किती कमी होईल हे तुमच्या बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतरच निश्चित होईल. आता आरबीआयने तर निर्णय घेतला आहे, त्यामुळे बँकाही आगामी काळात कपातीचा निर्णय घेतील.

समजा तुम्ही 30 वर्षांसाठी 50 लाखांचे कर्ज घेतले आहे आणि 9 टक्के व्याजदर आहे. त्यानुसार तुम्हाला महिन्याला 40,231 रुपयांचा हप्ता बसेल. आता आरबीआयने यात 0.50 टक्के कपात केल्याने तुमचा हप्ता 38,446 रुपये होईल. याचाच अर्थ तुमचा महिन्याचा हप्ता 1785 रुपयांनी कमी होईल.

जर एखाद्या व्यक्तीने 30 लाखांचे कर्ज 8.5 टक्के व्याजदराने 20 वर्षांसाठी घेतले असले तर त्याच्या महिन्याचा हप्ता 26,035 रुपये असेल. आता रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर व्याजदर 8 टक्के होईल आणि 30 लाखांच्या कर्जावरील महिन्याता हप्ता 25,093 रुपये होईल. याचाच अर्थ तुमचे महिन्याला 942 रुपये वाचतील.