कलिना येथील करमणुकीच्या मैदानासाठी आरक्षित भूखंड खासगी संस्थेला देण्याचा घाट! शिवसेनेने विचारला मुख्याधिकाऱ्यांना जाब

मुंबईच्या पश्चिम उपनगरात सांताक्रुझ कलिना येथील करमणुकीच्या मैदानासाठी राखीव असलेला सुमारे दोन एकरचा भूखंड खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला जात आहे. म्हाडाच्या मालकीचा आरक्षित भूखंड स्वतः विकसित न करता 10 कोटींची गुंतवणूक करून इतर संस्थेला देण्यावरून म्हाडाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी यासंदर्भात म्हाडा मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन जाब विचारला आहे.

सांताक्रुझ कलिना, मौजे कोलेकल्याण येथील मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मालकीचा करमणुकीच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या दोन एकरच्या भूखंडावर टेनिस खेळाच्या सुविधा विकासाकरिता महा टेनिस फाऊंडेशनसोबत संयुक्त विकास योजना राबविण्याचा प्रस्ताव म्हाडाच्या विचारार्थ आहे. करमणुकीकरिता आरक्षित भूखंड स्वतः विकसित न करता इतर संस्थेला देण्याचा अधिकार म्हाडाला आहे काय? याचा खुलासा करावा, अशी मागणी आमदार संजय पोतनीस यांनी केली आहे.

z कायद्यानुसार करमणुकीच्या मैदानासाठी आरक्षित भूखंड निविदा काढून वितरित करणे बंधनकारक असताना सदर भूखंडासाठी म्हाडामार्फत ई-निविदा प्रणाली कार राबविण्यात आली नाही.

z जमीन मालक म्हाडा असताना तसेच म्हाडा स्वतः गुंतवणूक करीत असतानाही नफ्यामध्ये म्हाडाची भागीदारी फक्त 60 टक्के का आहे, याबाबतचा खुलासा करण्यात यावा.

विद्यापीठात टेनिससाठी दिलेल्या जागेचा वापरच नाही

टेनिस खेळासाठी देण्यात येत असलेल्या कोलेकल्याण विभागात शेजारीच मुंबई विद्यापीठ कॅम्पसमध्ये टेनिस खेळाचा उत्कर्ष करण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या जागेचा उद्देशाकरिता वापर झालेला नाही. यावरून टेनिस खेळाबाचत असलेली उदासीनता लक्षात येते. तरीही 10 कोटींची गुंतवणूक करून, नाममात्र शुल्क आकारून खासगी संस्थेला म्हाडाचा भूखंड कशासाठी दिला जात आहे?