Panvel news – माफ करा, हे मूल सांभाळू शकत नाही! नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकून निर्दयी आई पळाली

पनवेलच्या तक्का गावात शनिवारी सकाळी एका बास्केटमध्ये नवजात अर्भक सापडले आहे. याच बास्केटमध्ये एक चिठ्ठीही मिळाली असून त्यात ‘मला माफ करा, आम्ही हे मूल सांभाळू शकत नाही’ असे म्हटले आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी पोटच्या गोळ्याला रस्त्यात टाकून पळ काढणाऱ्या या निर्दयी मातेविरोधात संताप व्यक्त होत आहे.

तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता त्यांना नवजात बाळ दिसले. नागरिकांनी तत्काळ पनवेल शहर पोलिसांना माहिती दिली. बाळाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत ‘प्रिय सर/मॅडम, आम्हाला हे करावे लागले यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही. कृपया या प्रकरणात कोणालाही गुंतवू नका किंवा प्रकरण वाढवू नका. आम्हाला जे काही सहन करावे लागत आहे, ते या बाळाच्या नशिबी येऊ नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की तिची काळजी घ्या. आशा आहे की एक दिवस आम्ही तिला परत घेऊ. कारण आम्ही तिच्या जवळच आहोत. आम्ही दिलगीर आहोत.’