ऑलिम्पिक यजमानपदासाठी हिंदुस्थानचा दावा; अहमदाबादमध्ये स्पर्धा आयोजनाची तयारी, सौदी अन् तुर्कीही यजमानपदाच्या शर्यतीत

गेल्या काही ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत अवघ्या जगाचे लक्ष वेधणार्या हिंदुस्थानने 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीपुढे (आयओसी) दावा ठोकला आहे. अपेक्षेप्रमाणे अहमदाबादचेच नाव देण्यात आले आहे.

स्वित्झर्लंडमधील लुजान शहरात झालेल्या बैठकीत केंद्रीय क्रीडा मंत्रालय व हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षा पीटी उषा यांच्यासह हिंदुस्थानच्या प्रतिनिधी मंडळाने ‘आयओसी’कडे 2036च्या ऑलिम्पिक यजमानपदाचा दावा ठोकण्याचे धाडस केले आहे. हिंदुस्थानी खेळाडूंना गेल्या शंभर वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात एका स्पर्धेत कधीही दोन सुवर्ण पदके जिंकता आलेली नाहीत. मात्र गेल्या दोन दशकांत हिंदुस्थानच्या पदक संख्येत उल्लेखनीय वाढ झाल्यामुळे क्रीडा संस्पृती झपाटय़ाने वाढत असल्याचे दिसून आलेय. हिंदुस्थानच्या या संस्पृतीला अजून उत्तुंग भरारी घेता यावी म्हणून हिंदुस्थानी सरकारने 2036च्या ऑलिम्पिक यजमानपदाचे प्रयत्न सुरू केले आहेत.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नव्या महिला अध्यक्षा कर्स्टी कोवेन्ट्री यांनी भविष्यातील ऑलिम्पिक यजमानपदाची लिलाव प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिक यजमानपदाच्या निवड प्रक्रियेत ‘आयओसी’चा अधिक सहभाग असायला हवा यासाठी नवीन प्रक्रिया तयार करण्यात येणार आहे. 2036च्या ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत सौदी अरब, इंडोनेशिया, तुर्की व चिली या देशांचाही समावेश आहे. हिंदुस्थानने गतवर्षीच ऑक्टोबरमध्ये पत्राद्वारे ‘आयओए’कडे ऑलिम्पिक यजमानपदाची इच्छा व्यक्त केली होती. आता ‘आयओए’च्या नव्या अध्यक्षा कर्स्टी कोवेन्ट्री यांना ऑलिम्पिक यजमानपदाच्या निवड प्रक्रियेत आपला अधिक सहभाग हवा आहे. त्यामुळे नव्या निवड प्रक्रियेनंतर पुढे काय घडते याकडे तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील.

हिंदुस्थानला अधिक संधी

हिंदुस्थानचे अनेक क्रीडापटू जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण करीत आहेत. हिंदुस्थानात खेळ आणि खेळाडूंचेही महत्त्व दिवसागणिक वाढताना दिसतेय. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या हिंदुस्थानने आजवर इतक्या मोठय़ा प्रमाणात कधीही ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन केले नसले तरी राष्ट्रपुल स्पर्धा तसेच क्रिकेटचे अनेक वर्ल्ड कप यशस्वीरीत्या आयोजित करून आपला दबदबा दाखवला आहे. जर हिंदुस्थानला ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याची संधी लाभली तर या स्पर्धा न भूतो न भविष्यति अशाच पद्धतीने आयोजित केल्या जातील आणि अवघ्या जगाला हिंदुस्थानची क्रीडासत्ताही अनुभवायला मिळेल.  जगभरातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा एक अद्भुत अनुभव देणारी असेल. या यजमानपदासाठी सौदी अरब, इंडोनेशिया, तुकाa व चिली हे देश उत्सुक असले तरी आयोजन क्षमता आणि आयोजनाबद्दल असलेल्या उत्सुकतेपोटी हिंदुस्थान या लढाईत बाजी मारण्याची शक्यता आहे.