परप्रांतीय मजुरांनी केला कीर्तनकार महिलेचा खून, पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

चोरीच्या उद्देशाने सद्‌गुरू नारायणगिरी आश्रम परिसरातील देवीच्या मंदिरात दोन चोरटे शिरले होते. मंदिराचा दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याने कीर्तनकार सुनीताताई महाराज यांना अचानक जाग आली. त्यांनी आरडा-ओरड केली तर आपण पकडले जाऊ, या भीतीने चोरट्यांनी त्यांच्यावर थेट हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून खुनात समावेश असलेल्या दोन्ही परप्रांतीय आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नापूर्णा सिंह यांची उपस्थिती होती. यावेळी माहिती देताना डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले की, वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात सद्‌गुरू नारायणगिरी आश्रमामध्ये मोहटादेवी मंदिर आहे. या मंदिरात राहणाऱ्या कीर्तनकार सुनीताताई अण्णासाहेब पवार महाराज यांचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना 27 जून रोजी सकाळी उघडकीस आली होती. या खुनाच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती. मंदिराचे गेट तोडताना दोघेजण सीसीटीव्ही वॅ मेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी या फुटेजवरून मारेकऱ्यांचा शोध घेतला असता संशयित व्यक्तीचे महालगाव शिवारात गणेश भेळ सेंटर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांना घटनेच्या तीन दिवसानंतर ताब्यात घेतले होते. त्यात संतोष उर्फ भायला जगन चौहान (रा. अंछली, ता. सेंधवा, जि. बडवानी, रा. मध्यप्रदेश ह. मु. गाढे पिंपळगाव, ता. वैजापूर) आणि अनिल उर्फ हाबडा नारायण विलाला (रा. अंछली, ता. सेंधवा, जि. बडवानी, रा. मध्यप्रदेश) अशी त्यांची नावे असल्याचे समोर आले. संतोष चौहान हा वर्षाभरापासून मजूर म्हणून परिसरात काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

मंदिरात दर्शनाला आल्यानंतर आखला चोरीचा प्लॅन

संतोष चौहान हा मूळचा मध्यप्रदेशातील असून तो गेल्या वर्षभरापासून वैजापुरात राहत होता. तो शेतमजुरीसह इतर कामे करीत होता. संतोष हा एकदा सद्‌गुरू महाराज मंदिरात दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्याने मंदिरात चोरी करण्याचा प्लॅन आखला होता. स्थानिकाच्या मदतीने चोरी केली तर पकडल्या जाण्याची भीती होती. त्यामुळे त्याने त्याच्या गावाचा मित्र अनिल बिलाला याला बोलावून बालावून घेतले होते. चोरीची मोहीम फत्ते झाल्यानंतर काही दिवसांनी तो महालगावात थांबून मूळगावी मध्यप्रदेशात पळून जाणार होता. तर चोरी झाल्यानंतर त्याने अनिलला मध्यप्रदेशाकडे पाठविले होते.

आरोपीकडून चोरीचा ऐवज जप्त

या खुनातील आरोपी संतोष उर्फ भायला जगन चौहान याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून मंदिरातून चोरीला गेलेला काही ऐवज जप्त करण्यात आला. संतोष चौहान याने ही चोरी त्याचा मित्र अनिल उर्फ हाबडा नारायण विलाला याच्या साथीने केल्याची कबुली दिली. तर आरोपी अनिल उर्फ हाबडा विलाला याला पोलिसांनी मध्यप्रदेशाच्या सीमेवरून ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे, सुधीर मोटे, पोलीस हवालदार वाल्मीक निकम, विठ्ठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, गोपाळ पाटील, महेश बिरूटे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक संजय तांदळे, निलेश कुडे, पोलीस हवालदार विजय ब्राम्हदे, गणेश पंडुरे, रावते, अभंग, चालक जिरे यांनी केली.