सामना अग्रलेख – अंबादास पवार, मु. पो. लातूर

महाराष्ट्रातील सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांचे दुश्मन आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी निवडणुका जिंकल्या, पण सत्ता मिळाल्यानंतर ते याविषयी बोलायला तयार नाही. या वर्षी पहिल्या तीन महिन्यांतच महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण या सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. हजारो कोटी खर्चून शक्तिपीठ महामार्ग उभारायला सरकारकडे पैसा आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र पैसा नाही. लातूरच्या अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याने बैलाचा खर्च परवडत नाही म्हणून स्वतःला औताला जुंपून घेतल्याचे पाहून महाराष्ट्र हळहळला, पण शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या पाषाणहृदयी सरकारचे मन त्याने द्रवेल काय?

कुत्रा माणसाला चावला हे नेहमीचेच आहे, पण माणूस कुत्र्याला चावला ही बातमी ठरते. लातूर येथे बैलांच्या जागी अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याने स्वतःला औताला जुंपले व कोळपणी केली हे छायाचित्र ‘सामना’च्या पहिल्या पानावर झळकले आणि महाराष्ट्राच्या विधानसभेला हादरे बसले. राज्यातील शेतकऱ्यांची दशा या छायाचित्राने जगासमोर आणली. कोरोना काळात गंगेत प्रेते तरंगत असल्याच्या छायाचित्राने जगात खळबळ माजली तितकीच खळबळ औताला जुंपलेल्या अंबादास पवारांच्या छायाचित्राने झाली. माणुसकीला काळिमा फासणारे हे चित्र महाराष्ट्राचे आहे. या महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या फडणवीस, शिंदे, पवारांना लाज आणणारे आहे. बारामतीतल्या ‘माळेगाव’ साखर कारखान्याची निवडणूक जिंकण्यासाठी अर्थमंत्री पवारांनी मतास 20 हजार रुपये वाटले, पण त्यांच्या राज्यात लातूरचे अंबादास पवार बैल विकत घेता येत नाही म्हणून स्वतःला औताला जुंपून घेतात. असे चित्र अनेक गुलाम राष्ट्रांत दिसत होते, पण आता ते स्वतंत्र हिंदुस्थानात दिसू लागले आहे. प्रगत, संपन्न वगैरे राज्याचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या या चित्राने किती राजकारण्यांची मने हेलावली? हे एक चित्र समोर आले, पण राज्यात असे असंख्य अंबादास पवार औताला जुंपले गेले आहेत. महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दुर्दशेचे हे प्रातिनिधिक चित्र आहे. लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याकडे जेमतेम चार एकर शेतजमीन आहे व तीही कोरडवाहू. शेताची पेरणीपूर्व मशागत व अन्य कामांसाठी ट्रॅक्टर अथवा बैलाचा

खर्च परवडत नसल्याने

अंबादास पवार व त्यांची वृद्ध पत्नी हे दोघेच शेतात राबतात. मुलगा पुण्यात छोटे-मोठे काम करतो. नातवंडांचे शिक्षण आणि वर्षभराचा खर्च यांचा मेळ कुठेच बसत नाही. त्यामुळे शरीर थकले असतानाही बैलाऐवजी स्वतः अंबादास पवार औताला जुंपून घेतात आणि मागे त्यांची वृद्ध पत्नी चालते. मन हेलावून टाकणारा हा प्रकार आहे. शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणतो, शेतकरी राजा म्हणतो आणि त्या राजाचीच आज काय विपन्नावस्था झाली आहे बघा! महाराष्ट्रातील दोन-पाच एकर शेतजमीन असलेल्या तमाम छोट्या शेतकऱ्यांची अवस्था आज अंबादास पवार यांच्याप्रमाणेच झाली आहे व शेतकऱ्यांच्या दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या परिस्थितीकडे लक्ष देण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडे वेळ नाही. शेतमालाला भाव मिळत नाही, दुसरीकडे बियाणे व खतांचे भाव दुपटीने वाढले आहेत. मजुरीचा खर्च आवाक्यापलीकडे गेला आहे. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीची आपत्ती या निसर्गाच्या दुष्टचक्रात भरडून निघणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्यांना गळफासाकडे ढकलण्याचे पाप हे सरकार करीत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ’ अशी घोषणा तीन पक्षांच्या या महायुती सरकारने केली होती. मात्र निवडणुका जिंकल्यानंतर सरकारची तिन्ही तोंडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर गप्प आहेत. महाराष्ट्रात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतच तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने निवडणुकीआधी दिलेला शब्द पाळला असता व कर्जमाफी दिली असती तर यापैकी काही शेतकऱ्यांचे तरी प्राण नक्कीच वाचले असते. मुख्यमंत्री म्हणतात, योग्य वेळी कर्जमाफी देऊ. आता ही योग्य वेळ नेमकी कोणती? आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर सरकार

कर्जमाफीचा मुहूर्त

काढणार आहे? तीन पक्षांची महायुती स्वतःला ‘ट्रिपल इंजिन सरकार’ म्हणवते, पण या सरकारच्या तिन्ही इंजिनांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नाही. शेतकरी मेला तरी चालेल, बळीराजा उद्ध्वस्त झाला तरी चालेल, पण सरकारच्या चरणी थैल्या अर्पण करणारे कंत्राटदार व ठेकेदार तेवढे जगले पाहिजेत, हेच या सरकारचे धोरण आहे. राज्यातील शेतकरी अवकाळी पावसात, गारपिटीच्या तडाख्यात बरबाद झाला तरी सरकारला त्यांची जराही फिकीर नाही. उलट ट्रिपल इंजिनांचे हे सरकार शेतकऱ्यांना चिरडून कंत्राटे आणि मलिदा यांच्याच मागे वेगाने धावत आहे. राज्यात कोणाचीही मागणी नसताना नागपूरपासून गोव्यापर्यंत शक्तिपीठ महामार्गाचा घाट या सरकारने घातला तो यासाठीच. जोरजबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून, पोलिसी बळाचा वापर करून दडपशाहीच्या मार्गाने सरकारची तिन्ही इंजिने शेतकऱ्यांना चिरडायला निघाली आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांचे दुश्मन आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी निवडणुका जिंकल्या, पण सत्ता मिळाल्यानंतर ते याविषयी बोलायला तयार नाहीत. या वर्षी पहिल्या तीन महिन्यांतच महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण या सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. हजारो कोटी खर्चून शक्तिपीठ महामार्ग उभारायला सरकारकडे पैसा आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र पैसा नाही. लातूरच्या अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याने बैलाचा खर्च परवडत नाही म्हणून स्वतः औताला जुंपून घेतल्याचे पाहून महाराष्ट्र हळहळला, पण शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या पाषाणहृदयी सरकारचे मन त्याने द्रवेल काय?