राहुरीचे मुळा धरण निम्मे भरले

मुळा धरणाच्या लाभक्षेत्रावर पावसाचा लपंडाव सुरू असताना, पाणलोट क्षेत्रावर मात्र आषाढ सरी कोसळत आहेत. मुळाच्या बॅक वॉटरमध्ये 5 हजार 990 क्युसेक प्रवाहाने आवक होत असताना, धरणसाठा निम्मा झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. 26 हजार दलघफू क्षमता असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा 13 हजार दलघफू (50 टक्के) इतका झाला आहे.

मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उप अभियंता विलास पाटील व शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांच्याकडून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लहित खुर्द येथील सरिता मापन केंद्राकडे विशेष लक्ष दिले जात आहे. धरणसाठा समाधानकारक असताना, धरणाकडे होणारी कमी-जास्त आवक पाहाता यंदा धरण अपेक्षानुरूप लवकर भरेल, अशी आशा आहे.

दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड, पांजरे व कोतूळ हद्दीमध्ये आषाढी सरी कोसळू लागल्याने धरणाकडे काही प्रमाणात आवक वाढली. 2 ते 3 हजार क्युसेकने होणाऱया आवकेत वाढ होऊन काल (दि. 1 जुलै) रोजी सायंकाळी आवक 5 हजार 990 क्युसेकने होत होती. धरणसाठय़ातही वाढ होऊन मुळाचा पाणीसाठा 13 हजार दलघफू झाल्याची नोंद मुळा पाटबंधारे विभागाने जाहीर केली.

गोदापात्रातून साडेबारा हजार क्युसेकने विसर्ग

नाशिक जिल्हय़ातील गंगापूर, दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढले असून, गोदापात्रातील विसर्ग वाढवण्यात आला आहे. दारणा 4214 क्युसेक, गंगापूर 3716 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. नांदुर मधमेश्वर धरणातून आज 12620 क्युसेक इतका विसर्ग झाला आहे.

दारणा व गंगापूर धरणांत टप्प्याटप्प्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. दारणा व गंगापूर धरणे 60 टक्के भरली आहेत. कोपरगावातही गोदापात्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. दरम्यान, कोपरगावात पावसाचे प्रमाण घटले. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असून, पेर वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.