
>> श्रीप्रसाद पद्माकर मालाडकर
आकाशवाणी मुंबई केंद्र 23 जुलै 1927 रोजी सुरू झाले. आकाशवाणी मुंबई केंद्र सुवर्ण महोत्सवाच्या सुमाराला 1976 मध्ये एका सुवर्णस्वराने आकाशवाणी मुंबई केंद्रात प्रवेश केला आणि 2006 पर्यंत तो स्वर श्रोत्यांच्या कानात कायमचा स्थानापन्न झाला. तो ऋजुता स्वर होता सुषमा हिप्पळगावकर यांचा. जन्माने त्या दादरकर होत्या. त्यांचा जन्म मुंबईत दादरमध्ये 11 सप्टेंबर 1951 रोजी झाला. त्या माहेरच्या सुषमा विश्वनाथ जोगळेकर. त्यांच्या आईचे नाव लीला जोगळेकर, वडिलांचे नाव विश्वनाथ जोगळेकर. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिक्षण महर्षी बापूसाहेब रेगे यांच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत झाले. त्यांचे उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. नागपूरमध्ये पत्रकारितेचे शिक्षण झाल्यावर काही काळ तेथेच त्यांनी पत्रकारिता केली. 1975 मध्ये आकाशवाणीत कार्यक्रम अधिकारी पदाची जाहिरात आली. लेखी, मुलाखत, स्वर परीक्षा देऊन त्या आकाशवाणी मुंबई केंद्रात 1976 मध्ये रुजू झाल्या. एक-दोन विभाग वगळले तर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या सर्व विभागांसह त्यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या जाहिरात प्रसारण सेवेचासुद्धा पदभार सांभाळला. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अनेक श्रुतिकांत, नभोनाटय़ांत, त्या सहभागी व्हायच्या. त्या रुजू झाल्या त्या काळात स्त्रियांसाठी वनिता मंडळ कार्यक्रमात ताई, माई लीलावती भागवत आणि कमलिनी विजयकर असायच्या. नंतरच्या काळात विमल जोशी पण होत्या. दुपारी 12.40 ते 12.55 ही 15 मिनिटे वनिता मंडळ कार्यक्रमांतर्गत कुटुंब कल्याण कार्यक्रमासाठी राखीव असायची. त्यात कुटुंब कल्याण विषयक आणि दैनिक गोष्टींवर भाष्य करणारा संवाद नेहमी असायचा त्या कार्यक्रमाचे नाव ‘आत्याचा संवाद’ असायचे. या कार्यक्रमात आत्या असायच्या ज्येष्ठ आकाशवाणी कलाकार, मराठी नाटय़ व चित्रपट अभिनेत्री मंदाकिनी भडभडे आणि त्यांच्या भाची सुधा असायच्या सुषमा हिप्पळगावकर, तर सुधीर ज्येष्ठ आकाशवाणी कलाकार, नाटय़, दूरदर्शन कलाकार विलास गुर्जर असायचे. तत्कालीन प्रत्येक घरातली गृहिणी आणि लहान मुले ‘आत्याचा संवाद’ आवर्जून न विसरता ऐकायचे. वनिता मंडळसह त्यांनी ‘गंमत जंमत’, ‘बाल दरबार’ हे लहान मुलांचे कार्यक्रमसुद्धा सादर केले. काही काळ कामगारांसाठी कामगार सभा कार्यक्रमांतर्गत बुधवारच्या गप्पा ‘सहज सुचलं’ म्हणून काwटुंबिक श्रुतिकेत त्या असायच्या. नागपूरला असताना त्यांचा ज्येष्ठ नाटककार आणि आकाशवाणी मुंबई निर्माते पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्याशी परिचय झाला. त्या आल्या तेव्हा नभोनाटय़ निर्माते पुरुषोत्तम दारव्हेकरच होते. त्यांच्या पश्चात चंद्रकांत बर्वे यांच्या नंतर नभोनाटय़ विभाग सुषमा हिप्पळगावकर यांच्याकडे आला. त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण नभोनाटय़ांची निर्मिती केली. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या यूटय़ूब केंद्रद्वारे रसिक यांचा आनंद आजही घेऊ शकतात. जाहिरात प्रसारण सेवेच्या विविध भारतीच्या विशेष गीतगंगा कार्यक्रमात कार्यक्रम अधिकारी माधुरी कामत यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राचा सुवर्णस्वर कमलिनी विजयकर यांना आमंत्रित केले तेव्हा त्यांच्या कार्यक्रमाचा आरंभ आणि समाप्ती उद्घोषणा सुषमा हिप्पळगावकर यांनी केली आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राचे विज्ञान, कामगार सभा, एफ. एम. कार्यक्रम, आकाशवाणी मुंबई संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्रम समन्वयक कार्यक्रम अधिकारी रवींद्र हिप्पळगावकर यांच्याशी विवाह झाल्यावर त्या सुषमा रवींद्र हिप्पळगावकर झाल्या. ‘साप्ताहिक स्वास्थ्य सेवा’, ‘आरोग्यम् धन संपदा’ या कार्यक्रमांची त्यांची निर्मिती आहे. 2006 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सेवानिवृत्तीनंतरचा काळ त्यांनी कधी पर्यटन, तर कधी अविस्मरणीय आठवणीत आणि पती, कुटुंबीयासमवेत आनंदात व्यतीत केला. ‘हाती नाही येणे, हाती नाही जाणे, हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे’ असे स्वतःचे जीवन गाणे मानणाऱया सुषमा हिप्पळगावकर यांचे आकाशवाणी मुंबई केंद्र शतक महोत्सवाच्या जवळ असताना 3 एप्रिल 2025 रोजी निधन झाले, पण हे विश्व सोडताना त्यांना खात्री होती की, ‘असेन मी नसेन मी, परी असेल आवाज माझा, विविध कार्यक्रमांत रसिक ऐकतील आवाज माझा.