
>> संजय कऱ्हाडे
एजबॅस्टन कसोटी बऱयाच खेळाडूंसमोर बरेच प्रश्न ठाकून गेली… इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यापुढे बॅझबॉलचं तुणतुणं मिरवतील का? आता बाकी तिन्ही कसोटी सामन्यांसाठी अशाच निर्ढावलेल्या, निर्जीव खेळपट्ट्या ठेवतील का? या दोन प्रश्नांची उत्तरं सोप्पी आहेत!
शुभमन, यशस्वी, राहुल, पंत, जाडेजा यांनी आतापर्यंत दोन्ही कसोटीत दाखवलेला दर्जा बॅझबॉलचं खच्चीकरण करण्यासाठी पुरेसा आहे. बॅझबॉल म्हणजे नेमकं काय, तर टॉस जिंकल्यावर प्रतिस्पर्ध्याला प्रथम फलंदाजी द्यायची, लवकर बाद करायचं आणि चौथ्या डावात धडाकेबाज फलंदाजी करून सामना जिंकायचा. पण बॅझबॉलबाजी आकर्षक असू शकते, टिकाऊ नसते हे मॅकलम आणि स्टोक्सच्या ध्यानात नक्कीच आलेलं असेल. कारण हिंदुस्थानी फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. दोन डावात मिळून हजारपेक्षा जास्त धावा हिंदुस्थानी संघाने केल्यात!
आता खेळपट्टय़ा! एजबॅस्टनच्या झोपी गेलेल्या खेळपट्टीवर सिराज आणि आकाशदीपने इंग्लंडचा अहं कसा ठेचला हे मॅकुलम आणि स्टोक्स एवढय़ा लवकर विसरतील असंही मला वाटत नाही. त्यात भर, बुमरा तूप-पोळी खाऊन, धष्टपुष्ट होऊन, पुरेशी विश्रांती घेऊन हिंदुस्थानी संघात परततोय. त्यामुळे चेंडू सीम करणाऱया, गवताळ खेळपट्टय़ा ते उपलब्ध करण्याचं भयकारी स्वप्नसुद्धा पडू देणार नाहीत. म्हणतील, अशी स्वप्नं पडण्यापेक्षा रात्रभर जागे राहू!
मोहम्मद सिराज आणि आकाशदीप लॉर्ड्स कसोटीत उतरतील तेव्हा ते फक्त बुमराला साथ द्यायला म्हणून नाही तर बुमराच्या बरोबरीने इंग्लंडला बाद करण्यासाठी मैदानात उतरतील. आणखी एक अतिशय महत्त्वाचं. क्रिकेटचा खेळ मोठा बांका असतो. कुणीही, कधीही या खेळापेक्षा मोठा होऊ शकलेला नाही. ज्या कसोटीत ‘उपलब्ध’ असूनसुद्धा बुमराने अति ताणामुळे खेळणं टाळलं तीच कसोटी हिंदुस्थानने त्याच्याशिवाय मोठय़ा ऐटीत जिंकली! आपल्या देशासाठी थोडा दमखम, थोडी जिगर, मोठं मन त्याने एजबॅस्टनलाच दाखवलं असतं तर आज त्याच्या चेहऱयावरचा आनंद अधिक मोकळा, फुललेला दिसू शकला असता!
शुभमन मात्र बराचसा अधिक स्थिरावलेला असेल. उदंड असा आत्मविश्वास त्याला मिळालाय. टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना तो मागेपुढे पाहणार नाही. इंग्लंडच्या बॅझबॉलचा हट्ट आता त्याला शंकास्त करणं कठीण. कसोटी जिंकण्याचा तोच मंत्र असतो! हिंदुस्थानी प्रशिक्षक गौतम गंभीरसुद्धा विजयानंतर मस्त दिलखुलास हसताना दिसला! गंभीरला अन् त्याच्या विजयी संघाला हसऱ्या शुभेच्छा!
दुसरा एस.एम.जी.
आला रे आला, शुभमन आला! दुसऱ्या कसोटीतल्या आपल्या जबरदस्त कामगिरीनंतर असे हाकारे आता नियमितपणे ऐकू येतील. सामन्यात पहिल्या डावात 269 आणि दुसऱया डावात 161. एकूण 430 धावा. दोन कसोटीत 585. आणखी तीन कसोटींचे सहा डाव बाकी! सुनील गावसकरांचा एका मालिकेत 774 धावा दणकावण्याचा विक्रम आजच्या क्षणाला क्षतिग्रस्त ठरलाय! याबद्दल गावसकर आजतकवर म्हणालेत, ‘त्याचं नाव शुभमन गिल म्हणजे एस.जी! आणि जर कुणी त्याचं नाव ‘शुभ मन गिल’ असं घेतलं तर एस.एम.जी. आहे.’ गमतीचा भाग सोडला तरी आपल्याला दुसरा ‘एस.एम.जी’ मिळाला आहे असं म्हणायला काय हरकत आहे!