Wimbledon 2025 – इगा स्विटेकची प्रथमच उपांत्य फेरीत धडक

पोलंडच्या इगा स्विटेकने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदाच प्रवेश करत आपल्या कारकीर्दीतील मोठा टप्पा गाठला. बुधवारी झालेल्या सामन्यात तिने 19 व्या मानांकित स्वित्झर्लंडच्या ल्युडमिला सॅमसोनोव्हा हिला 6-2, 7-5 असे सरळ सेटमध्ये हरवले.

सॅमसोनोव्हाविरुद्धच्या सामन्यात स्विटेकने पहिला सेट सहज 6-2 असा जिंकला आणि दुसऱया सेटमध्ये 3-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सॅमसोनोव्हाने जोरदार पुनरागमन करत 4-4 आणि 5-5 अशी बरोबरी साधली. मात्र निर्णायक क्षणी स्विटेकने 6-5 अशी आघाडी घेतली आणि नंतर सॅमसोनोव्हाचा सर्व्हिस ब्रेक करत सामना आपल्या नावावर केला. विजयानंतर तिच्या चेहऱयावर दिलासादायक हास्य झळकले.

पाच वेळची ग्रँडस्लॅम विजेती असलेल्या स्विटेकने यापैकी चार विजेतेपदे फ्रेंच ओपनच्या मातीवरील कोर्टवर आणि एक यूएस ओपनच्या हार्ड कोर्टवर मिळवली आहेत. ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही तीने दोनदा उपांत्य फेरी गाठली होती, मात्र विम्बल्डनमधील हिरवळीचे कोर्ट तिला आजवर फारसे रुचले नव्हते. 2018 मध्ये तिने येथे ज्युनियर गटाचे जेतेपद जिंकले असले तरी महिला गटात गेल्या पाच वर्षांत तिला केवळ एकदाच 2023 मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठता आली होती.

मात्र यंदा इगा स्विटेक ही विम्बल्डनच्या हिरवळीच्या कोर्टवर सहजपणे खेळताना दिसत आहे. यामागचे एक कारण म्हणजे तिने आपली हालचाल सुधारली असून अनुभवाच्या जोरावर ती सफाईदारपणे खेळताना दिसत आहे. विम्बल्डनपूर्वी तिने बॅड हम्बर्ग, जर्मनी येथे हिरवळीच्या कोर्टवरील स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. ती गेल्या वर्षभरातील तिची कोणत्याही स्पर्धेतील पहिलीच अंतिम फेरी ठरली होती. याआधी गेल्या महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये एरिना सबालेंकाविरुद्ध उपांत्य फेरीत पराभव झाल्याने तिच्या सलग 26 विजयांची मालिका खंडित झाली होती.