
गेल्या आठवडय़ात हिंदुस्थानच्या पुरुष संघाने एजबॅस्टनवर प्रथमच तिरंगा फडकवला होता तर हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघानेही टी-20 मालिकेत पहिल्यांदाच मालिका विजयाचा नवा इतिहास घडविला. यजमान इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका हिंदुस्थानी महिलांनी आधीच 3-1 फरकाने जिंपून इंग्लंडमध्ये प्रथमच टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
हिंदुस्थानी महिला संघाने चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 6 फलंदाज आणि 18 चेंडू राखून पराभव केला. इंग्लंडला 7 बाद 126 धावसंख्येवर रोखल्यानंतर हिंदुस्थानी संघाने 17 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 127 धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना (32) व शफाली वर्मा (31) यांनी 42 चेंडूंत 56 धावांची भागीदारी केली.
चार्ली डीनने शफालीला कॅप्सीकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. मग सोफी एक्लेस्टोनने मानधनाला फिलरकडे झेल देण्यास भाग पाडले. या दोघी बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद 24) व कर्णधार हरमनप्रीत कौर (26) हिंदुस्थानला विजयाच्या समीप नेले, मात्र विजयासाठी केवळ 8 धावांची गरज असताना हरमनप्रीत बाद झाली. इस्सी वोंगने तिला एक्लेस्टोनकरवी झेलबाद केले. मग जेमिमाने रिचा घोषला (नाबाद 7) हाताशी धरून हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.