
रेल्वेच्या क्यूआर कोड तिकीट बुकिंगमधील त्रुटींचा गैरफायदा उठवत गेल्या वर्षभरात तब्बल चार कोटींहून अधिक प्रवाशांनी पश्चिम रेल्वेला गंडवले. प्रवासी संख्येत अचानक झालेल्या मोठ्या घसरणीनंतर प्रवाशांनी केलेल्या फसवणुकीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवळपास 4 कोटी 10 लाख प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे रेल्वेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने क्यूआर कोड तिकीट बुकिंगची सुविधा नुकतीच बंद केली. मागील वर्षभरात अनेक प्रवाशांनी या सुविधेचा गैरफायदा घेतला आणि रेल्वेच्या महसुलावर मोठा परिणाम केला. कोरोना काळ संपल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवाशांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ झाली होती. 2023 मध्ये 1 एप्रिल ते 31 ऑगस्ट या कालावधीत 400.36 दशलक्ष प्रवाशांची नोंद झाली होती. त्यात पुढील वर्षभरात 10 टक्क्यांची वाढ झाली आणि 2024 मध्ये 1 एप्रिल ते 31 ऑगस्टदरम्यान 441.25 दशलक्ष प्रवासी संख्या नोंदवली गेली.
‘क्यूआर’ प्रणालीतील त्रुटी महिनाभरात दूर करणार
क्यूआर कोड तिकीट बुकिंग प्रणालीतील त्रुटींचा सध्या सखोल आढावा घेतला जात आहे. प्रवासी कोणत्याही प्रकारे या प्रणालीचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत. यादृष्टीने महिनाभरात चाचपणी केली जाईल आणि संबंधित त्रुटी दूर केल्या जातील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.