चोराला पकडणाऱ्या पोलिसांचा गौरव; धावत्या बसमधून मोबाईल चोरणाऱ्यावर १५ मिनिटांत झडप

कल्याणमध्ये धावत्या बसमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या एका सराईत चोरट्याला पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडले. ड्रग्जचे सेवन केलेल्या चोरट्याने पोलिसांवर दगड उगारला. मात्र पोलीस उपनिरीक्षक अनिकेत नाईक यांनी धाडसाने त्याच्या मुसक्या आवळल्या. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन कल्याण परिमंडळ ३ चे उपायुक्त अतुल झेंडे यांनी पोलिसांचा गौरव केला.

महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे अनिकेत नाईक प्रशिक्षण घेत आहेत. गणेशोत्सव सणासाठी त्यांची कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात नेमणूक केली होती. २ सप्टेंबर रोजी वल्लीपिर चौक येथे ते पोलीस पथकासह बंदोबस्त ड्युटी करत होते. यादरम्यान नवी मुंबई परिवहन बसमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावून अमीर कलीम शेख या चोरट्याने पळ काढला. चौकात बस येताच पोलिसांना बघून चालकाने गाडी थांबवली. वाहकाने पळत येऊन चोरट्याने मोबाईल हिसकावल्याचे पोलिसांना सांगितले. चोरट्याचे वर्णन विचारून पीएसआय अनिकेत नाईक यांनी तातडीने हवालदार टोकरे यांच्या दुचाकीवरून चोरट्याचा पाठलाग केला. एक किमी अंतर गेल्यानंतर संशयित चोरटा दिसला. मात्र पोलिसांना पाहताच तो पळू लागला. याचवेळी प्रसांगावधान राखून नाईक यांनी बाईकवरून उडी मारून पाठलाग करून चोरट्याला पकडले.

अनिकेत नाईक यांच्या धाडसाचे कौतुक
अमीर शेख हा सराईत चोरटा आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची बाईक, ड्रग्ज घेतलेले इंजेक्शन हस्तगत केले. ड्रग्ज घेऊन चोरी करत असल्याची त्याने कबुली दिली. कल्याण परिमंडळ ३ चे उपायुक्त अतुल झेंडे यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक अनिकेत नाईक यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव केला.