
पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघात तिरंगी मालिका खेळली जाणार होती, मात्र यात सहभागी होण्यास आता अफगाणिस्तानने नकार दिला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व आयसीसी अध्यक्ष जय शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ”अमित शहा राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी करतात व स्वत:च्या मुलाला राष्ट्रप्रेम शिकवू शकले नाहीत. आज जर अफगाणिस्तानमध्ये जय शहा, अमित शहा असते तर सट्टेबाजीसाठी पैशासाठी ते देखील क्रिकेट खेळले असते”, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली.
”ऑपरेशन सिंदूर नरेंद्र मोदींच्या दबावात मागे घेतलं गेलं. आपले 26 लोकं मारले गेले. 26 भगिनींचं कुंकू पुसलं. त्यानंतरही आशिया कपमध्ये आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो. आम्ही अमित शहांना सांगितले की पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नको. त्यावेळी या भाजपच्या ढोंगी लोकांनी सांगितले की राजकारण आणि क्रिकेट वेगवेगळं आहे. अमित शहा राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी करतात व स्वत:च्या मुलाला राष्ट्रप्रेम शिकवू शकले नाही. अफगाणिस्तानमध्ये जय शहा, अमित शहा नाहीत. जर तिथे जय शहा अमित शहा असते तर सट्टेबाजीसाठी पैशासाठी ते देखील क्रिकेट खेळले असते. त्यामुळे अफगाणिस्तान हा एक प्रखर राष्ट्रवादी निर्णय घेऊ शकला. आमच्याकडे पैशाचे व्यवहार आहेत. अफगाणिस्तानमध्ये प्रखर राष्ट्रवादापुढे पैशांचे व्यवहार चालत नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
”राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे त्यांचे स्वागत आहे. महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती. इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी होती. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशी कोणती चर्चा झालेली नाही. उद्धव ठाकरे व राज ठाकरे मुंबई व मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकत्र आहेत. मुंबई. पुणे, ठाणे तुम्ही कुणाच्या हातात देणार आहात? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.
”पुण्यात जैन समाजाच्या साडे तीन हजार कोटींच्या जमिनीचा घोटाळा आहे ते कोण लोकं आहेत. एका ट्रस्टचा घोटाळा किती गंभीर आहे ते कळेल तुम्हाला. किती मंत्री या घोटाळ्यात आहेत ते कळेल. मिस्टर फडणवीस साहेब, राजकारण करताना जपूर करा, तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारता आणि आम्हाला ज्ञान देता. तुमच्या आधीपासून आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात रस्त्यावर आहोत. आम्हाला काही आयतं नाही मिळालं”, असा टोला देखील संजय राऊत यांनी यावेळी लगावला,
”आम्ही आणि मनसे ठाण्यात एकत्र लढणार आणि सत्तेवर आहे. आमचा नारा 75 पार आहे. यांचा सगळा खेळ आता संपत आलाय, दोन ठाकरे उडवणार सगळ्यांच्या ठिकऱ्या. आता यांचं सगळं संपत आलय. आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही. दोन ठाकरेंनी ठरवलं तर मुंबईचे रस्ते बंद करू शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार यादीचं हे प्रकरण केंद्राकडे पाठवलंय. त्यामुळेच मुख्य मुद्द्यावरच लक्ष उडवून टाकण्यासाठी फडवीसांनी मंत्रीमंडळातच जाती जातीमध्ये वाद सुरू केले आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.