
सौदी देशाचे चलन (रिआल)च्या नावाखाली फसवणूक प्रकरणी महिलेला माहीम पोलिसांनी अटक केली. राणी देवी मुकेशकुमार दास असे तिचे नाव आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते. मालाड येथे राहणारे तक्रारदार याचे माहीम परिसरात दुकान आहे. जून महिन्यात ते दुकानात होते तेव्हा अनिल नावाचा एक जण त्याच्याजवळ आला. त्याने सौदी अरबचे चलन असलेले 100 रिआलची नोट दाखवली. ती नोट घेणार का अशी विचारणा केली तेव्हा तक्रारदार याने नकार दिला. नकार दिल्यावर दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तेथे आला. तेव्हा त्याने एका महिलेकडे 100 रिआलच्या नोटा आहेत असे भासवले. त्या महिलेला वैद्यकीय उपचारासाठी पैशाची गरज असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्यानंतर एकाने त्यांना एक नोट दिली. ती नोट त्याने शेजारी एका दुकानात बदली केली. त्याच्या मोबदल्यात त्यांना दीड हजार रुपये मिळाले. विश्वास बसल्याने त्याने 100 नोटा घेण्याची तयारी दर्शवली. ठरल्यानुसार तक्रारदार यांना सांताक्रुझ परिसरात भेटण्यासाठी बोलावले. तेथे ठगाने त्याची एका महिलेसोबत ओळख करून दिली. तिने तिच्याकडे 100 रिआलच्या नोटा असल्याचे सांगितले. त्यानंतर तीन दिवसांनी ते पुन्हा महिलेला भेटण्यासाठी सांताक्रूझ परिसरात गेले. एकाने त्याच्याकडून एक लाख रुपये घेऊन एक कापडी पिशवी दिली. त्या पिशवीत नोटा असल्याच्या भूलथापा मारल्या. ती पिशवी तपासत असताना ते दोघे निघून गेले. त्या पिशवीत नोटा नसल्याचे त्याच्या लक्षात आले.
फसवणूकप्रकरणी त्याने माहीम पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोनजणांविरोधात गुन्हा नोंद केला. या गुह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राणी देवी मुकेशकुमार दासला ताब्यात घेतले. तिला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.