ब्रेकअपनंतर काळाचौकीत माथेफिरू प्रियकराचे भरचौकात प्रेयसीवर वार

काळाचौकी-लालबाग परिसर आज रक्तरंजित थरारक घटनेने हादरला. गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या काळाचौकीच्या आंबेवाडीतील तरुण-तरुणीचा अत्यंत करुण अंत झाला. तिचे दुसऱ्याशी अफेअर सुरू आहे या संशयातून दहा दिवसांपासून सुरू असलेल्या दोघांमधील वादाने आज परिसीमा गाठली. सोनू बरई (24) या माथेफिरू तरुणाने मनीषा यादव (24) या तरुणीवर चाकूने असंख्य वार करून स्वतःचा गळादेखील चिरला. यात दोघांचाही मृत्यू झाला.

सोनू आणि मनीषा काळाचौकीच्या आंबेवाडीत एकाच परिसरात राहत होते. आज सकाळी सवादहा वाजण्याच्या सुमारास दोघेही दत्ताराम लाड मार्गावरील मयुरेश इमारतीजवळ भेटले. तेथे दोघांमध्ये काही तरी बोलणे झाले आणि भरचौकात काही कळायच्या आत सोनूने सोबत आणलेला चाकू काढून मनीषावर वार करण्यास सुरुवात केली. तिने बचाव करण्यासाठी तेथेच असलेल्या आस्था नर्सिंग होममध्ये धाव घेतली. सोनू तिच्या मागे तेथेही गेला आणि चाकूने मनीषाच्या हात, पोट, गळा, मानेवर सपासप वार करणे सुरूच ठेवले. तेव्हा वाहतूक पोलीस व नागरिक मनीषाला वाचविण्यासाठी धावल्यावर सोनूने हातातला चाकू स्वतःच्या गळ्यावर फिरवला.

अत्यंत निर्घृणपणे त्याने स्वतःचादेखील गळा चिरला. तो तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला, तर गंभीर जखमी झालेल्या मनीषाला वाहतूक पोलीस किरण सूर्यवंशी यांनी तत्काळ अन्य नागरिकांच्या मदतीने भायखळा येथील रेल्वेच्या डॉ.आंबेडकर इस्पितळात नेले. तेथून तिला जे. जे. इस्पितळात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच संध्याकाळी मनीषाचादेखील मृत्यू झाला, तर सोनूला केईएम इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला दाखलपूर्व मृत घोषित केले. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात हत्या व आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनू आणि मनीषा यांच्या गेल्या आठहून अधिक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मनीषा पदवीधर तर सोनू अकरावीपर्यंत शिकलेला होता. तो कॅटरिंगचा व्यवसाय करायचा. परंतु तीन महिन्यांपासून व्यवसायदेखील बंद होता. दोघांनी लग्न करायचेदेखील ठरवले होते. पण 15 दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. मनीषाचे दुसऱ्या मुलासोबत सूत जुळले असल्याचा सोनूला संशय होता. त्यातून त्यांच्यात भांडणे होत होती. अखेर आज ही मोठी घटना घडल्याचे पोलीस सांगतात. आता दोघेही हयात नसल्याने सकाळी दोघांमध्ये असे काय घडले किंवा गुरुवारी रात्री त्यांच्यात काय बोलणे झाले हे समजू शकणार नाही. परिणामी ही घटना घडण्यामागचे नेमके कारण गुलदस्त्यातच राहिल्याचेही सांगण्यात येते.

ते देवदूतासारखे मदतीला आले, पण…

भायखळा वाहतूक विभागात कार्यरत असलेले अंमलदार किरण सूर्यवंशी हे सकाळी ड्युटीवर हजर झाल्यानंतर आस्था नर्सिंग होम येथे गडबड असल्याचे त्यांना नियंत्रण कक्षाकडून समजले. त्यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा नर्सिंग होमच्या बाहेर नागरिकांची गर्दी व रस्त्यावर वाहनांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे सूर्यवंशी यांनी नर्सिंग होमजवळ जाऊन पाहिले असता आतमधे एक तरुण चाकूने तरुणीवर सपासप वार करत असल्याचे आले. त्यावेळी काही नागरिक बांबूने तरुणाच्या हातातला चाकू खाली पाडण्याचा प्रयत्न करत होते.

सूर्यवंशी यांनीदेखील जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीचा पाय पकडून तिला नर्सिंग होमच्या बाहेर ओकाआणि क्षणाचाही विलंब न लावता तिला टॅक्सीतून डॉ. आंबेडकर इस्पितळात नेले. तेथून तिला जे. जे. इस्पितळात नेण्यात आले. गंभीर जखमी मनीषा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना सूर्यवंशी यांनी कसलीही तमा न बाळगता माणुसकी दाखवत आधी तिला सोनूच्या तावडीतून सोडवले. मग तिला झटपट इस्पितळातदेखील नेले. सूर्यवंशी यांनी प्रामाणिकपणे मदतीचा हात दिला. पण जखमा एवढ्या गंभीर होत्या की मनीषाला अखेर मृत्यूने कवटाळले.

इन्स्टावर तरुणाला फॉलो केल्याने वादाची ठिणगी

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मनीषाने इन्स्टाग्रामवर एका तरुणाला फॉलो केले होते. त्यावर सोनूचा आक्षेप होता. त्यातून तो तिच्यावर संशय घेऊ लागला. त्यातून दोघांमध्ये खटके उडू लागले. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यात सतत वाद होत होते. त्यामुळे दोघांचा ब्रेकअपदेखील झाला होता. तरीही त्यांच्यात वाद सुरूच होता. गुरुवारी रात्रीदेखील फोनवर बोलताना वाद झाला होता.