
राहुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरातील दोन न्यायाधीशांचे बंगले अज्ञात चोरटय़ांनी फोडले असून, या घटनेत नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिवाणी न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी आणि सहदिवाणी न्यायाधीश पंकज पाटील यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. राहुरी न्यायालयाच्या पाठीमागे न्यायाधीशांच्या निवासासाठी स्वतंत्र व्यवस्था असून, त्यापैकी दोन बंगल्यांत ही चोरी झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि ठसेतज्ञ पथकास पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान पथकाला चोरटय़ांचा माग घेण्यात यश आले नाही. त्यामुळे चोरटे कोणत्या मार्गाने आले आणि पळून गेले याचा शोध लागलेला नाही.
राहुरीत पोलिसांची रात्रीची गस्त केवळ कागदावरच चालते, प्रत्यक्षात ती होत नसल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून नागरिक करत आहेत. न्यायाधीशांचे बंगले फोडले जाणे हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत ‘कोणताही मौल्यवान ऐवज चोरीला गेला नाही,’ असा खुलासा केला आहे. राहुरी तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळत असून, पोलिसांचा धाक उरलेला नाही, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, पत्रकारांनी घटनास्थळी छायाचित्रण करण्याचा प्रयत्न केला, असता पोलिसांनी परवानगी दिली नाही.




























































