
अस्तगाव येथील 35 चारी परिसरात शुक्रवारी (दि. 24) रात्री एक बिबटय़ा विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली. कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीचा अंदाज न आल्याने हा बिबटय़ा सुमारे 12 तास विहिरीच्या पाण्यात अडकला होता. स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या कर्मचाऱयांनी तातडीने कार्यवाही करत बिबटय़ाला सुखरूप बाहेर काढले.
अस्तगावमधील धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत हा बिबटय़ा मध्यरात्रीनंतर पडला असावा, असा अंदाज आहे. विहिरीमध्ये चांगले पाणी असल्याने बिबटय़ाने काही काळ पाण्यात पोहून स्वतःला सावरले. विहिरीत पडण्यापूर्वी बिबटय़ाने जवळच असलेल्या बिडवे यांच्या शेतात मेंढय़ांच्या कळपावर हल्ला केला होता. या हल्ल्यात कळपातील एक कोकरू बिबटय़ाने फस्त केले होते. त्यानंतर एका कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीचा अंदाज न आल्याने बिबटय़ा विहिरीत पडला.
विहिरीलगत शेख यांची वस्ती आहे. रात्रीच्या वेळी विहिरीतून काहीतरी आवाज येत असल्याचे वस्तीतील सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित विहिरीचे मालक कुलकर्णी यांना याची कल्पना दिली. कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल चौधरी यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे कर्मचारी कोणतीही वेळ न दवडता घटनास्थळी दाखल झाले.
वनविभाग आणि ग्रामस्थांनी समन्वयाने पिंजरा विहिरीत सोडून बिबटय़ाला पिंजऱयात येण्यासाठी प्रवृत्त केले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर बिबटय़ा पिंजऱयात आला आणि त्याला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थ आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे बिबटय़ाचे प्राण वाचले.






























































