
>> प्रभाकर पवार, [email protected]
एक दशकापासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या २४ वर्षीय सोनू बराय व त्याच्याच वयाच्या मनीषा यादव या तरुणीचे प्रेमसंबंध अचानक संपुष्टात आले. थोडक्यात ‘ब्रेकअप’ झाले तरीही त्यांचे भावनिक नाते काही संपले नव्हते. त्यांचे फोनवर रोज बोलणे व्हायचे. सोनू व मनीषा हे काळाचौकी येथील आंबेवाडी परिसरात राहत होते. मूळच्या उत्तर प्रदेशातील या प्रेमी युगलाचे प्रेमसंबंध तुटतील असे त्यांच्या कुटुंबीयांनाही वाटले नव्हते. मनीषा ही सुशिक्षित पदवीधर, तर सोनू हा एसएससी उत्तीर्ण तरुण होता. तो पेशाने स्वयंपाकी होता, परंतु कुठेही त्याला नोकरी नव्हती. त्याचा मेंदू रिकामा होता. सैतानाचे घर झाले होते. इंग्रजीत त्याला Empty Mind Devils WorkShop म्हणतात. आपली गेल्या दहा वर्षापासून मैत्रीण असलेल्या मनीषाच्या चारित्र्यावर त्याला संशय आला. त्याची ठाम समजूत झाली की. दुसऱ्या कुणातरी तरुणासाठी मनीषाने आपल्याला धोका दिला आहे. आता तिला आपण जिवंत सोडायचे नाही हे त्याने पक्के ठरविले. त्याने मनीषाला घरापासून जवळच असलेल्या काळाचौकी पोलीस ठाण्यापासून हाकेवर असलेल्या दत्ताराम लाड मार्गावर (गोड बोलून) शेवटच्या भेटीसाठी बोलविले. आपण मनीषाला भेटायला जात आहे असे सोनूने आपल्या घरच्यांना सांगितले. मनीषानेही आपण सोनूला भेटायला जात असल्याचे आपल्या कुटुंबीयांच्या कानावर घातले. २४ ऑक्टोबरच्या शुक्रवारी काही हे दोघे प्रेमी युगल आपल्या घरी परतले नाहीत.
सकाळी १०:३० ची वेळ होती. सोनू व मनीषा गजबजलेल्या दत्ताराम लाड मार्गावरून बोलत बोलत चालले असताना अचानक सोनूने आपल्या पाठीमागे आपला उजवा हात नेला व पॅन्टमध्ये खोवलेला धारदार सुरा बाहेर काढला. काही कळायच्या आतच त्याने हसतमुख दिसणाऱ्या, अत्यंत आत्मविश्वासू अशा तरुणीवर सपासप वार केले. रक्ताने माखलेली मनीषा जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये जीव वाचविण्यासाठी शिरली, परंतु किरण सूर्यवंशी या वाहतूक पोलिसाने तिला तत्काळ वैद्यकीय मदत पुरवूनही तिचे प्राण वाचले नाहीत. ध्येय साध्य न झाल्यामुळे वैफल्यग्रस्त सोनूने स्वतः वरही वार करून घेतले. एका फटक्यात कोंबड्याची मान कापावी तशी आपलीही मान त्याने कापून घेतली. केवढे हे कौर्य? याला माणूस म्हणावे की राक्षस? काही वेळाने या राक्षसानेही जागेवरच तडफडत आपले प्राण सोडले.
प्रेमभंग झाल्यामुळे किंवा एकतर्फी प्रेमातून आजची तरुण पिढी कोणत्याही टोकाला जात आहे. आपल्या प्रेयसीला पेट्रोल ओतून जाळणे ही निर्दयता. सूडबुद्धी, मत्सर, द्वेष, मानसिक संतुलन ढासळल्याचीच लक्षणे आहेत. अशांना ‘सायकोपॅथ’ विकृत म्हणावे नाही तर काय? मनीषा गेली दहा वर्षे एका क्रोधी, मत्सरी तरुणाबरोबर फिरत होती. तिला त्याच्यातील हिंसक वृत्ती, क्रौर्यभाव कसा दिसून आला नाही? तेव्हा आजच्या तरुण मुलींनो, कुणावरही प्रेम करण्यापूर्वी, त्याला मित्र बनविण्यापूर्वी अनेकदा विचार केला पाहिजे. आपल्या संभाव्य जोडीदाराचे वर्तन पाहिले पाहिजे, त्याचे निरीक्षण केले पाहिजे. त्याचे शिक्षण, करीअरचे उद्दिष्ट आपल्या जीवनाशी सुसंगत आहे का? आपली विचारसरणी जुळत आहे का? या साऱ्या गोष्टी पडताळूनच निर्णय घेतला पाहिजे, परंतु आजची तरुण पिढी आपला जोडीदार निवडण्यापूर्वी कोणतीच दक्षता घेत नाही. आजच्या
त्यांच्या प्रेम व नात्यांमध्ये त्याचा अभाव दिसतो. लहानसहान गैरसमजांवर नाती तुटताना दिसतात. प्रेम ही माणसाची अत्यंत सुंदर भावना आहे. आजच्या सोशल मीडियामुळे ओळखी पटकन होतात, परंतु त्यात धोकेही दडलेले असतात. ऑनलाइन चॅटिंगवर विश्वास ठेवणे, नातेसंबंध वाढविणे धोक्याचे झाले आहे. प्रेमात पडताना विचार करा. भावनेला महत्त्व देऊ नका. विचारांना महत्त्व द्या. कुणी प्रेमाच्या नावाखाली त्रास देत असेल तर आई-वडिलांना सांगा, पोलिसांना माहिती द्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवा.
जगात स्त्रीशक्ती महान आहे. त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला तर त्या जग बदलू शकतात. जीवनात अडथळे येतातच, पण प्रत्येक संकट हे एक नवीन शिकवण घेऊन येते. धैर्याने उभे राहिले तर छेडछाड, स्टॉकिंग, ऑनलाइन धमक्या किंवा घरगुती हिंसा याला आळा बसेल. आजचा काळ प्रगतीचा आहे, परंतु दुर्दैवाने महिलांसाठी तो असुरक्षित झाला आहे. सातारच्या फलटणमध्ये एका डॉक्टर महिलेने एका पोलीस अधिकारी व त्याच्या सहकाऱ्याच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून गेल्या आठवड्यात गळफास लावून आत्महत्या केली. पुरुषप्रधान संस्कृतीचा हा बळी होय!
न्यायप्रक्रियेतील विलंबामुळे गुन्हेगार अधिकाधिक निर्भय बनत आहेत, तर समाज उघड्या डोळ्यांनी महिलांवरील अत्याचार बघत आहे. नाहीतर उल्हासनगरातील दहावीतील विद्यार्थिनी रिंकू पाटील परीक्षा केंद्रातील वर्गात एकतर्फी प्रेमातून कापरासारखी जळाली नसती. हरेश पटेल या माथेफिरूने रिंकूवर भरवर्गात पेट्रोल ओतून जाळले. स्वतःही आत्महत्या केली. पालघरमधील श्रद्धा वालकरचे काय झाले? आई-वडिलांचा विरोध असतानाही आफताब पुनावाला या कॉल सेंटरमधील भस्मासुराच्या ती प्रेमात पडली आणि आयुष्यातून उठली. दिल्ली येथील आपल्या भाड्याच्या घरात आफताबने श्रद्धाचे तुकडे तुकडे केले आणि जंगलात फेकून दिले. मग अमेरिकेतील सिरियल किलर व आपल्या देशातील हरेश पटेल, सोनू बराय, आफताब या मनोरुग्णांमध्ये फरक तो काय? क्रौर्य ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अशा प्रवृत्ती, विकृतीपासून आजच्या तरुणींनी सावध राहिले पाहिजे.




























































