
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगात हत्या करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे आज जगभर खळबळ उडाली. पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सोशल मीडिया हँडल्सवर तसा दावा करण्यात आला. त्यामुळे इम्रान खान यांचे काय झाले, ते नेमके आहेत कुठे याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, इम्रान खान यांचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रावळपिंडी येथील अदियाला जेलला वेढा दिला. इम्रान यांच्या काळजीपोटी त्यांना भेटायला गेलेल्या त्यांच्या तिन्ही बहिणींवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घडामोडींमुळे परिस्थिती कमालीची स्पह्टक बनली असून पाकिस्तानात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
लष्कराशी मतभेद झाल्यानंतर इम्रान खान यांना पाकिस्तानची सत्ता सोडावी लागली होती. सत्ता सोडल्यानंतर इम्रान खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयानेही त्यांना दोषी ठरवले. ऑगस्ट 2023 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. तुरुंगात असतानाही त्यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ हा पक्ष देशात सक्रिय आहे. इम्रान यांची सुटका होत नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
…ही पाकिस्तानच्या अंताची सुरुवात
इम्रान खान यांची हत्या केल्याच्या कथित वृत्तावर बलुचिस्तानच्या स्वयंघोषित सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. इम्रान यांच्या हत्येची माहिती खरी असेल तर ही पाकिस्तानच्या अंताची सुरुवात असेल, असे बलुचिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.
दिवे घालवून पोलिसांचा हल्ला
इम्रान यांच्या जिवाचे बरेवाईट झाल्याची चर्चा सुरू होताच त्यांच्या तीन बहिणी नोरीन नियाझी, आलिमा खान व डॉ. उज्मा खान यांनी आदियाला जेलकडे धाव घेतली. त्यांनी जेलबाहेर शांतपणे ठिय्या देत इम्रान यांच्या भेटीची मागणी केली. त्याचवेळी जेलच्या परिसरातील विजेचे दिवे बंद करण्यात आले व त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. फरपटत नेण्यात आले व मारहाण करण्यात आली.
…आणि ठिणगी पडली!
मागील दीड महिन्यापासून सरकारने जेलमध्ये इम्रान यांची भेट घेण्यावर बंदी घातली आहे. खैबर पख्तुन्वा प्रांताचे मुख्यमंत्री सोहेल अफ्रिदी यांनी सात वेळा इम्रान यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना भेटीची परवानगी दिली गेली नाही. इम्रान खान यांच्या तिन्ही बहिणींना पुन्हा-पुन्हा भेटीची परवानगी नाकारण्यात आली. तिथेच संतापाची ठिणगी पडली.



























































