नरेंद्र मोदी स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 29 घरांवर चालवला बुलडोजर, अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमकडे जाणारा रस्ता वाढवण्यासाठी महापालिकेने शनिवारी सकाळी 29 घरांवर बुलडोजर फिरवला. ही सर्व घरे बेकायदेशीरित्या अतिक्रमण करून बांधलेली असल्याचे सांगत पालिकेने तोड कारवाई केली आहे. दरम्यान या घरात राहणाऱ्या नागरिकांनी ‘आम्ही गेली 60 वर्ष या ठिकाणी राहतोय. पालिकेने कोणतीही नोटीस न बजावता घरांवर हतोडा मारला आहे. त्यामुळे ऐन कडाक्याच्या थंडीत आम्ही रस्त्यावर आलो आहोत’ असा आरोप केला आहे.

तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हिंदुस्थानला लाभले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या शताब्दी वर्षासाठी अहमदाबादला अधिकृतपणे मंजुरी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद शहरात तयारीला सुरुवात झाली असून नरेंद्र मोदी स्टेडियमकडे जाणारा रस्ता मोठा करण्यासाठी या रस्त्याच्या बाजूला असलेल्या अनधिकृत बांधकामांवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत बलदेवनगर व सुभाष नगरमधील 29 घरांवर बुलडोजर चालवण्यात आला आहे.

या कारवाई विरोधात तिथे राहणाऱ्या नागरिकांनी गुजरात उच्च न्यालायात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने या रहिवाशांची याचिका फेटाळून लावली होती. मात्र नागरिकांनी आपण 60 वर्षांपासून इथे राहत असून आमची घरं पक्की बांधलेली आहेत. असा युक्तीवाद केला होता. मात्र न्यायालयाने शहर विकास अंतर्गत त्यांची घरे अनधिकृत असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळून लावली होती.