
संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून या अधिवेशनात मतदार यादी फेरतपासणी (एसआयआर) वरून रणकंदन अटळ मानले जात आहे. दिल्लीतील दहशतवादी स्पह्ट, जीवघेणे प्रदूषण, नव्या कामगार कायद्यातील जाचक तरतुदींसह जनहिताच्या अनेक प्रश्नांवर सरकारला घेरण्याची जय्यत तयारी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे हे अधिवेशन प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत सुरू होत असलेल्या अधिवेशनाआधीच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत याची चुणूक दिसली. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजीजू यांनी बोलावलेल्या या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह विरोधी पक्षांचे गट नेते उपस्थित होते. या बैठकीत विरोधकांनी एसआयआरचा मुद्दा उपस्थित केला. आता मतांची चोरी नव्हे थेट दरोडा टाकला जात आहे, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांनी यावेळी केला. त्यावरून तणाव निर्माण झाला. रिजीजू यांनी विरोधकांना सहकार्याचे आवाहन केले.
हे मुद्दे गाजणार…
एसआयआरची घिसाडघाई, बीएलओंचे मृत्यू
वंदे मातरम् बोलण्यास मनाई
अधिवेशनाचा अल्प कालावधी
दिल्लीतील दहशतवादी हल्ला
दिल्लीसह विविध शहरांतील प्रदूषण
नव्या कामगार कायद्यातील जाचक तरतुदी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर सरकारचे मौन
चीनबाबत गुळमुळीत भूमिका
मोदी-शहा रडारवर
या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रामुख्याने विरोधकांच्या रडारवर असतील. पहलगाम हल्ल्यानंतर काही महिन्यांतच दिल्ली बॉम्बहल्ला झाल्याने गृह खात्याचे अपयश चव्हाटय़ावर आले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा पाकिस्तानवर काहीच परिणाम झाला नसल्याचे यातून सिद्ध झाले आहे. यावरून विरोधक नरेंद्र मोदी व अमित शहा यांना घेरण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्दय़ावरही विरोधक मोदी-शहांना धारेवर धरण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचा ‘वंदे मातरम्’चा बुलंद नारा
राज्यसभेचे सभापती राधाकृष्णन यांनी नवे नियम आणले आहेत. सभापतींच्या निर्णयाविरोधात बोलण्यास मज्जाव, भाषण संपवल्यानंतर सदस्यांना ‘वंदे मातरम्’ किंवा इतर घोषणा देण्यास मनाई केली आहे. या नियमांना तीव्र विरोध करत शिवसेनेने ‘वंदे मातरम्’चा नारा बुलंद केला आहे. शिवसेनेचे खासदार वंदे मातरम् बोलणारच, हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करून दाखवा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे हा मुद्दा सभागृहात तापणार आहे.



























































