
नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीला सर्व राजकीय पक्षांनी विरोध केला असला तरी साधुग्रामसाठी वृक्षतोडीवर सरकार ठाम आहे. झाडे कापण्याची वेळ येऊ नये किंवा अगदी कमीत कमी अत्यावश्यक तितकीच झाडे कापायची वेळ यावी. मी महापालिकेला तसे सांगितले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हणाले.
नाशिक तपोवन येथे कुंभमेळ्यासाठी झाडे कापण्यास मोठा विरोध होत आहे. त्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, झाडांना कापणे योग्य नाही, असे आमचेही मत आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, प्रयागराजला जो कुंभमेळा झाला तिथे 15 हजार एकर जागा होती. नाशिकमध्ये फक्त तीनशे-साडेतीनशे एकर जागा आहे. रामपुंड तर नाशिक शहराच्या मध्येच येते. तिथे साधुग्राम करायचे आहे. दुसरी जागाही उपलब्ध नाही. तसेच 2015 सालची गुगल इमेजरी जर आपण पाहिली तरी तिथे ही झाडे दिसून येत नाहीत. नाशिक महापालिकेने ही झाडे लावली होती, पण आता साधुग्रामचा विषय आला तेव्हा कळले की यातील झाडे कापावी लागणार आहेत. पण कमीत कमी झाडे कापावी लागतील याकडे लक्ष देण्यास आम्ही सांगितले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कुंभमेळ्यासाठी पर्यावरणाचा ऱहास व्हावा असे कोणालाच वाटत नाही. जिथे पर्याय नाही अशीच झाडे कापावी. वृक्षतज्ञांशी चर्चा करून झाडांचे इतरत्र पुनर्रोपण करावे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
































































