
देशातील सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी इंडिगोच्या सेवेचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. इंडिगोची गेल्या दोन दिवसात दोन हजाराच्या आसपास उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. दरम्यान इंडिगोची सेवा कोलमडल्यामळे इतर विमान कंपन्यांनी त्यांचे दर अव्वाच्या सवा वाढवले होते. पाच ते सहा हजाराच्या तिकीटासाठी विमान कंपन्यांनी 60 ते 90 हजार रुपयांपर्यंत प्रवासभाडे आकारले. विमान कंपन्यांच्या या मनमानी कारभाराला केंद्र सरकारने चाप लावला आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाने या विमान कंपन्यांविरोधात कडक भूमिका घेत भाडं वाढवू नका अशी सक्त ताकीद दिली आहे. तसेच विमान कंपन्यांना भाड्याची मर्यादा देखील लागू करण्यात आली आहे. जोपर्यंत परिस्थिती नॉर्मल होत नाही तोपर्यंत सरकारने ठरवून दिल्याप्रमाणेच भाडे राहतील असे आदेश नागरी उड्डाण मंत्रालयाने दिले आहेत.
सरकारने दिलेल्या आदेशानुसार 500 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी विमान कंपन्या 7500 पर्यंत भाडे आकारू शकतात. तर 500 ते 1000 किलोमीटरच्या प्रवासासाठी कमाल भाडे 12,000 तर 1,000 ते 1500 किलोमीटरच्या मार्गांसाठी 15,000 रुपये आणि 1,500 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या उड्डाणांसाठी 18,000 रुपये निश्चित केले आहेत.




























































