
रमजानच्या पवित्र महिन्यात उमरा या धार्मिक विधीसाठी महाराष्ट्रातून सौदी अरेबियात गेलेले सुमारे 50 हजार ते 1 लाख मुस्लिम बांधव तेथे अडकले असण्याची शक्यता राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आयोगाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, सर्व यात्रेकरूंना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा राज्यातील सुमारे 500 टूर ऑपरेटर्सनी उमरा यात्रेचे नियोजन केले होते. यामध्ये एकट्या मुंबईतील 100 हून अधिक ऑपरेटर्सचा समावेश आहे. रमजाननिमित्त मक्का आणि मदीना येथे गेलेल्या भाविकांची संख्या मोठी असून, प्यारे खान यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार हा आकडा 50 हजारांच्या पुढे असू शकतो. यात्रेकरूंना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, राज्य अल्पसंख्यांक आयोग आता सक्रिय झाला असून सौदीतील प्रशासनाशी समन्वय साधून या नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंची नोंदणी सरकारकडे अधिकृतपणे होते. मात्र उमरासाठी जाणाऱ्यांची कोणतीही नोंदणी नसते. अनेकजण खासगी टूर अॅण्ड ट्रॅवल्स ऑपरेटर्सच्या माध्यमातून प्रवास करतात. त्यामुळे त्यांचा नेमका आकडा सांगणे कठीण होत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

























































