
इराण-इस्रायल युद्धाच्या भीषण परिस्थितीमुळे हिंदुस्थानच्या कृषी निर्यातीचे कंबरडे मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराण हा हिंदुस्थानी बासमती तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे, मात्र सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे तांदळाची जहाजे (Shipments) मध्येच थांबली असून, निर्यातदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
इराणमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात हिंदुस्थानी बासमती तांदळाची निर्यात केली जाते. मात्र युद्धाच्या धोक्यामुळे आणि हवाई तसेच सागरी हद्द सुरक्षित नसल्याने अनेक निर्यातदारांनी आपली जहाजे थांबवली आहेत. काही जहाजे बंदरांवरच उभी आहेत, तर काहींनी आपला मार्ग बदलला आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च तर वाढत आहेच, पण तांदूळ वेळेवर न पोहोचल्यास त्याच्या दर्जावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
टीव्ही९ भारतवर्षने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, इराणमधील अस्थिरतेमुळे बँकिंग व्यवहार आणि पेमेंट प्रक्रियेतही मोठे अडथळे येत आहेत. आधीच पाठवलेल्या मालाचे कोट्यवधी रुपये इराणमध्ये अडकले असून, नवीन ऑर्डर मिळणेही कठीण झाले आहे. जर हा संघर्ष असाच सुरू राहिला, तर हिंदुस्थानी तांदूळ बाजारात मोठी मंदी येण्याची शक्यता असून, याचा थेट फटका पंजाब आणि हरियाणातील तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनाही बसू शकतो.
निर्यातदारांनी केंद्र सरकारकडे या विषयात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सुरक्षित सागरी मार्ग उपलब्ध करून देणे आणि पेमेंटसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे, ही सध्याची मुख्य गरज असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने मालवाहतूक महागली आहे, ज्याचा परिणाम तांदळाच्या अंतिम किमतीवर होत आहे.

























































