
इराणने अमेरिकेचा पर्शियन आखातात प्रवेश रोखला आहे, तसेच होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे जगाचा तेलपुरवठा खंडित होणार असून तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात भडकणार असून जगभरात महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंदुस्थान, चीन, ब्राझीलसारख्या देशांना याचा मोठा फटका बसणार आहे. या देशांना या मार्गानेच सर्वाधिक तेलपुरठा होत असल्याने पुन्हा जगावरील तेलपुरठ्याचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे जागतिक तेल आणि नासर्गिक वायू पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यातच इराणने अमेरिकन जहाजांसाठी पर्शियन आखात बंद केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग इराणने बंद केल्याने जागतिक व्यापारावर आणि हिंदुस्थानवरही त्याचा परिणाम होईल.
इराण आणि ओमान यांच्यामध्ये स्थित होर्मुझची सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते. ही एक अतिशय अरुंद सामुद्रधुनी आहे, एका वेळी त्याची रुंदी फक्त २१ मैल (अंदाजे ३४ किलोमीटर) आहे. सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि कुवेत सारख्या प्रमुख तेल उत्पादकांसाठी हा मार्ग मुख्य निर्यात मार्ग आहे. दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल कच्चे आणि शुद्ध तेल या अरुंद समुद्रमार्गातून जाते, जे जागतिक तेल वापराच्या अंदाजे एक पंचमांश आहे. जर हा पुरवठा विस्कळीत झाला तर हिंदुस्थान, चीनसह प्रमुख आशियाई अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम होईल.
फेब्रुवारी २०२६ च्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांमुळे पश्चिम आशियात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. या घडामोडींचे हिंदुस्थानवर परिणाम होणार आहेत.
इंधन सुरक्षा आणि महागाई
कच्च्या तेलाचे भाव: जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९० ते १०० डॉलरच्या पार गेले आहेत. देशाच्या एकूण गरजेपैकी ८०% तेल आयात केले जाते, ज्यामुळे देशाचे आयातीचे बिल प्रचंड वाढणार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनी या मार्गाने देशाचे ५०% कच्चे तेल आणि ५४% एलएनजी (गॅस) याच मार्गाने येतो. इराणने हा मार्ग रोखल्याने इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात १०% पर्यंत वाढ होण्याची शक्यता असून, यामुळे वाहतूक खर्च वाढून सर्वसामान्यांच्या जीवनाश्यक वस्तू महाग होतील.
आर्थिक आणि बाजारपेठ
या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय शेअर बाजारात (Sensex आणि Nifty) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत असून, सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होण्याची भीती असून, यामुळे देशाची चालू खात्यातील तूट (Current Account Deficit) वाढू शकते.
धोरणात्मक फटका
इराणमधील चाबहार बंदर हा देशासाठी मध्य आशियात जाण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. युद्धाच्या सावटाखाली या प्रकल्पाचे काम थांबले आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करताना अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे (Sanctions) या प्रकल्पाचे भविष्य टांगणीला लागले आहे.
विमानसेवांनाही फटका
आखाती देशांमध्ये जवळपास ९० लाख भारतीय कार्यरत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हवाई क्षेत्र (Airspace) बंद केल्यामुळे एअर इंडिया आणि इंडिगो यांसारख्या कंपन्यांनी अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. युरोपला जाणाऱ्या विमानांना आता लांबच्या मार्गाने जावे लागत असल्याने प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत.
या सर्व घडामोंडीमुळे हा संघर्ष केवळ दोन देशांपुरता मर्यादित नसून ऊर्जा आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत हिंदुस्थानसाठी हे एक मोठे आव्हान आहे. तसेच या काळात सद्यस्थितीत तेल, नैसर्गिक वायूच्या तुटवड्याचा मोठा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे. तसेच शेअर बाजारातील घडामोडींमुळे आर्थिक फटका बसण्याचीही शक्यता आहे.

























































