नागपुरात स्फोटक कंपन्यांच्या स्फोटात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू, आमदार अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नागपूर जिल्ह्यातील विविध स्फोटक (एक्सप्लोझिव्ह) कंपन्यांमध्ये होत असलेल्या वारंवार स्फोटांच्या घटनांकडे लक्ष वेधले आहे. गेल्या 2 वर्षांत अशा दुर्घटनांमध्ये जवळपास 23 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण कायमचे अपंग झाल्याचा दावा त्यांनी पत्रात केला आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे त्यांनी नमूद केले.

देशमुख यांनी पत्रात नमूद केलेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड (चाकडोह, बाजारगाव), इकॉनॉमिक्स एक्सप्लोझिव्ह कंपनी (सावंगा-शिवा), केलटेक एक्सप्लोझिव्ह (गरमसुर, काटोल), चामुंडी एक्सप्लोसिव्ह (धामणा), डिफेन्स एक्सप्लोझिव्ह (सावंगा-शिवा), ओरिएंटेड एक्सप्लोझिव्ह (खापरी), एशियन फायर वर्क (कोतवालबर्डी), सोलर एक्सप्लोझिव्ह (राउळगाव), एसबीएल एक्सप्लोझिव्ह (राउळगाव) आणि अमिनो एक्सप्लोझिव्ह (ढगा, बाजारगाव) यांचा समावेश आहे.

मोठ्या दुर्घटनांची नोंद

देशमुख यांनी नमूद केल्याप्रमाणे,
12 ऑगस्ट 2023 रोजी सावंगा (शिवा) येथील इकॉनॉमिक्स एक्सप्लोझिव्ह कंपनीत स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला.
13 जून 2024 रोजी धामणा येथील चामुंडी एक्सप्लोझिव्हमध्ये स्फोट होऊन 9 कामगारांचा मृत्यू झाला.
17 डिसेंबर 2024 रोजी सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाला, त्यात 3 महिलांचा समावेश होता. 4 कामगार पूर्णपणे जळून खाक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
6 फेब्रुवारी 2025 रोजी कोतवालबर्डी येथील एशियन फायर वर्कमध्ये 2 कामगारांचा मृत्यू झाला.
3 सप्टेंबर 2025 रोजी सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये पुन्हा स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 2 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच 19 जून 2018 रोजीही याच कंपनीत स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे.

सुरक्षा यंत्रणांकडे बोट
स्फोटके कायदा 1884 आणि पेट्रोलियम कायदा 1934 अंतर्गत पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटना (PESO) तसेच संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) अंतर्गत असलेल्या अग्नि, स्फोटक व पर्यावरण सुरक्षा केंद्राकडे तपासणीची जबाबदारी आहे. याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयावर (कारखाने अधिनियम 1948 व संबंधित नियमांनुसार) कारखान्यांतील सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे.

मात्र, या सर्व यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्यामुळेच हे स्फोट होत असल्याचा दावा त्यांनी पत्रात केला आहे.

तज्ञ समितीची मागणी
नागपूर जिल्ह्यातील सर्व स्फोटक कंपन्यांचे तातडीने सेफ्टी ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने संयुक्तपणे तज्ञ समिती स्थापन करावी व राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.