
नवी दिल्लीहून मँचेस्टरला जाणारे इंडिगोचे विमान इथिओपिया सीमेजवळून माघारी वळवण्यात आले. विमानाचे पुन्हा दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमान माघारी का वळवण्यात आले याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.
इंडिगोचे 6E33 हे विमान सोमवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युनायटेड किंग्डममधील मँचेस्टरसाठी रवाना झाले. मात्र इथिओपियाच्या सीमेजवळ गेल्यानंतर विमानाने यू-टर्न करत पुन्हा दिल्लीत परतले. विमानाने अचानक यू-टर्न घेण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एअरलाइन्सकडूनही अद्याप स्पष्टीकरण देणारे अधिकृत विधान जारी केलेले नाही.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई निर्बंधांमुळे 28 फेब्रुवारीपासून उड्डाण सेवांवर लक्षणीय परिणाम झाला आहे. इंडिगोने इराण आणि इतर आखाती देशांवरील हवाई निर्बंधांमुळे 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान मध्य पूर्व आणि निवडक आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांसाठी 500 हून अधिक उड्डाणे रद्द केली.

























































