मुंबई क्षेत्रीय कार्यालय एक ‘नंबर वन’, कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेत थरारक विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय विमा कर्मचारी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील महिला आणि पुरुष कर्मचाऱयांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेत मुंबई क्षेत्रीय कार्यालय एकने जेतेपद पटकावत नंबर वन असल्याचे दाखवून दिले.

लोअर परेल येथील पश्चिम रेल्वे मैदानावर झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन न्यू इंडिया अॅश्युरन्सचे महाव्यवस्थापक के. व्ही. रमण यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई क्षेत्रीय कार्यालय एकचे उपमहाव्यवस्थापक विराग कुमार आणि मुंबई क्षेत्रीय कार्यालय पाचच्या उपमहाव्यवस्थापक शशिकला श्रीधरन उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून झालेल्या महिला गटातील सामन्यात मुंबई क्षेत्रीय कार्यालय पाचने चुरशीच्या लढतीत मुंबई क्षेत्रीय कार्यालय दोनचा पराभव करत बाजी मारली.

पुरुष गटात मुंबईतील विविध कार्यालयांतील 16 संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येक सामना अटीतटीचा ठरला. अंतिम सामन्यात मुंबई क्षेत्रीय कार्यालय एक आणि मुंबई क्षेत्रीय कार्यालय दोन या संघांमध्ये थरारक सामना रंगला. अखेरच्या षटकात उत्पंठा शिगेला पोहोचली आणि मुंबई क्षेत्रीय कार्यालय एक संघाने अवघ्या 2 धावांनी विजय मिळवत विजेतेपदाचा चषक पटकावला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मुंबई क्षेत्रीय कार्यालय तीनचे उपमहाव्यवस्थापक गौरव शर्मा उपस्थित होते.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपमहाव्यवस्थापक शशिकला श्रीधरन यांचा खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला.