
सोनम वांगचुक यांच्याशी संबंधीत एक महत्त्त्वाची माहिती समोर येत आहे. लडाखमधील पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून लवकरच सुटका होणार आहे. गृह मंत्रालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 24 सप्टेंबर 2025 रोजी लेहमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यानंतर वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत 26 सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले होते.
गेल्या वर्षी लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला होता, ज्यासाठी सरकारकडून वांगचुक यांच्यावर हिंसा भडकवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेऊन जोधपूरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, आता केंद्र सरकारने त्यांची कोठडी तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
लडाखमधील वारंवार होणारे बंद आणि निदर्शनांमुळे तेथील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. याचा मोठा फटका शिक्षण, रोजगार, स्थानिक व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राला बसला होता. मुख्य म्हणजे याामुळे तेथील अर्थव्यवस्थेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान लडाखच्या नागरिकांची चिंता दूर करण्यासाठी तेथील केंद्र सरकार तेथील विविध समुदायाच्या नेत्यांची चर्चा करत आहे. या पार्श्वभूमीवर, वांगचुक यांची सुटका हा लडाखमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.



























































