धडाम.. बूम.. मुळे व्रूमSs व्रूमSss बंद! आखातातील युद्धामुळे F1 रेस रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
F1 Bahrain and Saudi Arabia GPs Cancelled Due to Middle East Conflict Saamana

आखाती देशांमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. याचा परिणाम तिथल्या देशांमधील जनजीवन विस्कळीत होण्यावर झाला आहे. आता तर जगप्रसिद्ध F1 कार रेस देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धामुळे जागतिक क्रीडा विश्वावरही त्याचे गडद सावट पसरले आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या फॉर्म्युला वनच्या बहरीन ग्रँड प्रिक्स आणि सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स या दोन महत्त्वाच्या शर्यती सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा शनिवारी रात्री करण्यात आली. या निर्णयामुळे २०२६ चे एफ-१ कॅलेंडर आता २४ ऐवजी २२ शर्यतींचे होणार आहे.

इराणने बहरीन आणि सौदी अरेबियातील काही भागांना लक्ष केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बहरीनमध्ये अमेरिकेच्या पाचव्या नौदलाचे मुख्यालय असल्याने ते थेट इराणच्या रडारवर आहे. एका अहवालानुसार, बहरीन रेस ट्रॅकपासून अवघ्या ३२ किमी अंतरावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

इराणने होर्मुझची समुद्रधुनी रोखल्याने आणि मनामा (बहरीन) सारखी विमानतळे बंद झाल्याने जहाजांची वाहतूक आणि रसद पुरवठा (Logistics) पूर्णपणे ठप्प झाला आहे.

या शर्यतींसाठी लागणारे शेकडो टन सामान पाठवण्याची अंतिम तारीख २० मार्च होती. मात्र, युद्धाची भीषणता पाहता आयोजकांनी ही जोखीम न घेण्याचे ठरवले.

फॉर्म्युला वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टेफानो डोमेनिकाली म्हणाले, ‘हा एक कठीण निर्णय होता, परंतु मध्यपूर्वेतील सध्याची परिस्थिती पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने हाच योग्य मार्ग आहे.’ एफआयए (FIA) चे अध्यक्ष मोहम्मद बेन सुलायम यांनीही स्पष्ट केले की, खेळाडू, कर्मचारी आणि चाहत्यांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे.

५ आठवड्यांचा मोठा गॅप

२९ मार्च रोजी होणाऱ्या जपान ग्रँड प्रिक्सनंतर आता थेट ३ मे रोजी मियामी ग्रँड प्रिक्स होणार आहे. यामुळे संघांना कार सुधारण्यासाठी पाच आठवड्यांचा वेळ मिळणार आहे.

या दोन शर्यतींमधून मिळणारे सुमारे १०० दशलक्ष पौंड (सुमारे १,१०० कोटी रुपये) उत्पन्नाचे नुकसान फॉर्म्युला वनला सोसावे लागणार आहे.

एफ-२, एफ-३ आणि एफ-१ अकॅडमी या उप-शर्यतींचे फेरे देखील या ठिकाणांहून रद्द करण्यात आले आहेत.