
फेसबूक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची पॅरेंच कंपनी Meta पुन्हा एका मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. जवळपास १५ हजार नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मार्क झकरबर्ग यांच्या नेतृत्वाखालील ‘मेटा’ कंपनी आपल्या सर्वात मोठ्या कर्मचारी कपातीची तयारी करत आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या सुमारे २०% कर्मचाऱ्यांवर ही टांगती तलवार आहे. सध्या मेटाकडे सुमारे ७९,००० कर्मचारी असून, २०% कपातीचा आकडा १५,८०० पेक्षा जास्त होतो.
AI मधील प्रचंड गुंतवणूक
मेटा जनरेटीव्ह एआय (Generative AI) वर काम करण्यासाठी अधिक जोर देत आहे. यासाठी AI मध्ये संशोधन अभ्यास करणाऱ्यांना मोठे पॅकेज देण्यात येणार असल्याचे कळते आहे.
मेटाने २०२८ पर्यंत डेटा सेंटर्स उभारण्यासाठी ६०० अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्यासाठी एक योजना आखल्याचे कळत आहे. एवढा अवाढव्य खर्च पाहता त्यांच्यावर मोठा बोजा वाढण्याची शक्यता आहे. आता तो बोजा कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीचा पर्याय निवडला जात असल्याचे कळते आहे.
त्यासोबतच अलीकडेच मेटाने ‘Moltbook’ (AI एजंटसाठी सोशल प्लॅटफॉर्म) खरेदी केले असून, चिनी AI स्टार्टअप ‘Manus’ खरेदी करण्यासाठी २ अब्ज डॉलर्स खर्च करत आहे.
झकरबर्ग यांच्या मते, जे प्रकल्प पूर्वी मोठ्या टीमला करावे लागत होते, ते आता AI च्या मदतीने एखादी अत्यंत प्रतिभावान व्यक्ती एकट्यानेच करू शकते. त्यामुळे फार मोठ्या मनुष्यबळाची गरज कमी झाली आहे.
मेटाचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘ही केवळ एक शक्यता आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांना खर्चात कपात करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना आधीच मिळाल्याचे सूत्रांकडून समजते.’
दरम्यान, याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये ११,००० कर्मचारी (१३%) कमी करण्यात आले होते. मार्च २०२३ मध्ये १०,००० कर्मचारी कमी केले होते. तर यावर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी २०२६ मध्ये रिअॅलिटी लॅब्स विभागातून १,५०० जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला होता.
केवळ मेटामध्येच नाही, तर ॲमेझॉन (१६,००० कर्मचारी) आणि ब्लॉक (Jack Dorsey यांची कंपनी) सारख्या दिग्गज टेक कंपन्यांनीही AI मुळे आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यामुळे आता AI तंत्रज्ञान शिकून स्वत:ला अपडेट ठेवणे, अधिक कुशलता प्राप्त करणे गरजेचे आहे.


























































