
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना शिवसैनिकांनी जोरदार चपराक लगावली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 11 नवनिर्वाचित नगरसेवकांपैकी जे 4 नगरसेवक अधिकृत गटात सामील झाले नव्हते, त्यापैकी तीन शिलेदारांनी कोकण भवन येथे अधिकृतपणे ‘मशाल’ हाती घेत आपल्या निष्ठेची मोहोर उमटवली आहे. नगरसेविका स्वप्नाली केणे, राहुल कोट आणि कीर्ती ढोणे या तीन नगरसेवकांनी शिवसेना पक्षाच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ‘मातोश्री’शी असलेली निष्ठा जपली.
शिवसेनेचे गटनेते उमेश बोरगांवकर व पक्ष प्रतोद संकेश भोईर यांनी गट नोंदणी करून घेतली. कोकण भवन येथे या नगरसेवकांनी अधिकृत गट म्हणून नोंदणी केल्याने आता पालिकेत शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाली आहे.
आमची निष्ठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आहे, असे या नगरसेवकांनी नमूद केले. शिवसेना सचिव, आमदार वरुण सरदेसाई, उपनेते विजय साळवी, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, शरद पाटील, शहरप्रमुख कृष्णा परब, युवसेना कार्यकारिणी सदस्य योगेश निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली या नगरसेवकांनी गटनोंदणी केली.
मधुर म्हात्रे यांची हकालपट्टी
शिवसेनेच्या गटामध्ये 10 नगरसेवकांचा समावेश झाला असून उर्वरित एक नगरसेवक मधूर म्हात्रे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

























































