
अमेरिका, इस्रायलच्या सतत हल्ल्यानंतरही इराण पराभव मानायला तयार नाही. याउलट इराण मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करत आहे. यामुळे मध्यपूर्वेतील देशांची लटकंती झाली आहे. त्यांचे व्यापार, पर्यटन, जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे देश थेट अमेरिका इस्रायलच्या सोबत उभे राहून इराणवर हल्ले करू शकत नाही, पण इराण मात्र या राष्ट्रांमधील अमेरिका इस्रायलशी निगडीत गोष्टींना लक्ष्य करण्यात कोणतीही कसर सोडत नाही.
इराणने मंगळवारी संयुक्त अरब अमिराती (UAE) वर मोठे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. फुजैरा बंदरातील तेल प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले असून, अबुधाबीमध्ये क्षेपणास्त्राचे अवशेष पडून एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
अशा हल्ल्यांची अपेक्षा नव्हती!
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांवर आश्चर्य व्यक्त केले असून ‘अशा हल्ल्यांची अपेक्षा नव्हती’, असे म्हटले आहे. मात्र अशी माहिती रॉयटर्सच्या वृत्तातून देण्यात आली आहे की, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी युद्धापूर्वीच ट्रम्प यांना इशारा दिला होता की, इराणवर हल्ला केल्यास आखाती मित्रराष्ट्रांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
इराकची राजधानी बगदादमध्ये असलेल्या अमेरिकन दूतावासावर किमान ५ ड्रोन आणि रॉकेटने हल्ला करण्यात आला आहे. युद्धाच्या सुरुवातीपासूनचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले.
होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेने इतर देशांच्या नौदलाची मदत मागितली होती. मात्र, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इटली यांसारख्या देशांनी ट्रम्प यांची विनंती थेट धुडकावून लावली आहे. जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी स्पष्ट केले की, युद्धापूर्वी आम्हाला विश्वासात घेतले नव्हते, त्यामुळे आम्ही मदत करू शकत नाही. जपाने देखील हे अगदी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, अशा प्रकारची मदत करणे त्यांच्या देशाच्या नियमांमध्ये बसत नाही, त्यामुळे मदत करता येणार आहे.
यानंतर अडचणीत आलेल्या ट्रम्प यांनी आपल्याला कुणाच्या मदतीची गरज नसल्याचे विधान केले असले तरी त्यातून त्यांची अस्वस्थता दिसत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, इराण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही लोकवस्त्यांवर नाही तर अमेरिकेच्या तळांवर लक्ष्य केले आहे. इस्रायलवर क्षेपणास्त्र डागून आपली ताकद दाखवली आहे. आम्ही शक्ती कमी झाली नसून अचूकता वाढली आहे, असे इराणचे सभापती मोहम्मद बाकर कालीबाफ यांनी म्हटले आहे.




























































