
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडी आणि मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम कमोडिटी मार्केटवरही होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोने-चांदीचे दर गगनाला भिडले होते. सोने-चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सराफा बाजारातही शुकशुकाट दिसत होता. मात्र गेल्या 20 दिवसात सोने-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने स्वस्तात दागिने खरेदीची संधी निर्माण झाली आहे.
मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 2 मार्चला 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 67 हजार 471 रुपये तोळा होता. अवघ्या 15 दिवसांत सोन्याचा दर 1 लाख 47 हजार 218 रुपयांपर्यंत खाली आला आहे. याचाच अर्थ सोने 20 हजारांहून स्वस्त झाले आहे. सोन्याचा आतापर्यंतचा उच्चांकी दर 1 लाख 93 हजार 96 रुपये आहे. सध्याचा दर पाहता सोने उच्चांकी पातळीपेक्षा 48 हजार 271 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
चांदीच्या दरातसुद्धा घसरण झाली आहे. 2 मार्च रोजी चांदी 2 लाख 89 हजार 848 रुपये प्रति किलो होती. चांदीत 57 हजारांहून अधिक घसरण झाली असून चांदी प्रति किलो 2 लाख 32 हजार 364 रुपयांवर पोहोचली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गेल्या पाच दिवसांत चांदीचे भाव अक्षरशः गडगडले आहेत. 13 मार्च रोजी चांदीचा भाव 2 लाख 59 हजार 435 रुपये प्रति किलो होता. हाच दर शुक्रवारी 2 लाख 27 हजार 480 रुपयांवर बंद झाला. याचाच अर्थ आठवडाभरात चांदी 31 हजार 965 रुपयांनी स्वस्त झाली. 29 जानेवारी रोजी चांदीने 4 लाख 20 हजार 48 रुपयांचा ऐतिहासिक स्तर गाठला होता. त्या तुलनेत आता चांदी 1 लाख 92 हजार 578 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सहसा युद्ध किंवा जागतिक तणावाच्या परिस्थितीत सोन्या-चांदीचे दर वाढतात, मात्र सध्या मध्यपूर्वेतील युद्ध सुरू असतानाही किमती कोसळल्याने गुंतवणूकदार थक्क झाले आहेत. अमेरिकेच्या फेरल बँकेने पॉलिसी रेट स्थिर ठेवले आहेत. तसेच युद्ध परिस्थितीतही जोरदार विक्री झाल्याने सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. आगामी काळात यात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स एसोसिएशनच्या वेबसाईटनुसार सोन्याचे 10 ग्रॅमचे दर
24 कॅरेट – 1 लाख 47 हजार 218 रुपये
22 कॅरेट – 1 लाख 43 हजार 690 रुपये
20 कॅरेट – 1 लाख 31 हजार 20 रुपये
18 कॅरेट – 1 लाख 19 हजार 250 रुपये
14 कॅरेट – 94 हजार 960 रुपये























































