इराणकडून हिंदुस्थानच्या दिशेने येणाऱ्या कच्च्या तेलाच्या टँकरचा मार्ग बदलला; गुजरात ऐवजी चीनच्या दिशेने मार्गक्रमण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून मालवाहू जहाजांना प्रवासास इराणकडून बंदी घालण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्या. या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासंदर्भातील निर्बंध अमेरिकेने उठवले. त्यानंतर हिंदुस्थानला इराणकडून कच्चे तेल मिळणार असल्याचे बोलले जात होते. यामुळे हिंदुस्थानला तब्बल सात वर्षांनंतर इराणमधून कच्चे तेल मिळणार अशी शक्यता होती. मात्र पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार इराणमधून हिंदुस्थानच्या दिशेने निघालेल्या जहाजाचा मार्ग अचानक बदलण्यात आला असून आता ते जहाज चीनच्या दिशेने वळवण्यात आल्याचे कळते आहे. मात्र प्रवासादरम्यान कधीही गंतव्यस्थान बदलू शकते, अशी माहिती मिळत आहे.

‘पिंग शुन’ (Ping Shun) हा आफ्रॅमॅक्स टँकर गुजरातमधील वाडीनार बंदरात येणार असल्याचे संकेत या आठवड्याच्या सुरुवातीला मिळाले होते. मात्र आता हे जहाज चीनकडे वळवण्यात आले आहे. शिप ट्रॅकिंग फर्म ‘केप्लर’ने (Kpler) ही माहिती दिली. पिंग शुन हे 2002 मध्ये बांधण्यात आलेले 2025 मध्ये अमेरिकेची मंजूरी देण्यात आलेले टँकर आहे. गुजरातच्या वाडीनार बंदराऐवजी हे जहाज आज चीनमधील डोंगयिंग शहराच्या दिशेने जात असल्याचे समोर येत आहे.

व्यावसायिक जहाजांवर असणाऱ्या ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम (AIS) ट्रान्सपॉन्डर प्रणाली जहाजाचे गंतव्यस्थान सूचित करते. मात्र तेच जहाजाचे अंतिम स्थान असेल अशी अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. प्रवासादरम्यान, यामध्ये कधीही बदल होऊ शकतो, असेही पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.