
नवी मुंबईतून गांजा आणून तो मुंबईतील स्थानिक ड्रग्ज पेडलर्संना विकणाऱया ड्रग्ज माफियाला अॅण्टॉप हिल येथे अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 20 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.
मोहम्मद फारूख मोहम्मद हारूण खान (32) असे त्या ड्रग्ज माफियाचे नाव असून तो वडाळा येथे राहतो. खान गांजा घेऊन येणार असल्याची खबर अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक सूर्यवंशी यांच्या पथकाने अॅण्टॉप हिलच्या आणिक आगार परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याजवळ 20 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.


























































