
अमेरिकेत वॉशिंग्टन येथे होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत हिंदुस्थानी वंशाच्या रिनी संपत उतरल्या आहेत. रिनी यांचा जन्म तामीळनाडू येथे झाला असून त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही निवडणूक लढणाऱ्या त्या पहिल्या हिंदुस्थानी महिला ठरल्या आहेत. 31 वर्षीय रिनी या डेमोक्रेटिक पक्षाकडून निवडणूक लढवत असून त्या शासकीय पंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत.
रिनी सात वर्षांच्या असताना अमेरिकेत आल्या आणि त्यानंतर त्यांचे शिक्षण व करिअर तेथेच घडले. वॉशिंग्टन डीसीमध्ये त्यांना राहून आता दशकाहून अधिक काळ झाला आहे. या काळात त्यांनी स्थानिक समस्यांचा जवळून अभ्यास केला आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये डेमोव्रॅटिक पक्षाचे प्राबल्य असल्याने 1975 पासून महापौरपदी त्याच पक्षाचे उमेदवार विजयी होत आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास रिनी यांनी व्यक्त केला आहे.
शहराचा विकास करणार
रिनी संपत यांनी पुढे स्पष्ट केले की, महापौर म्हणून शहराचा सर्वांगीण विकास करणे ही त्यांची प्राथमिकता असेल. रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करणे, नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, सांडपाणी व्यवस्थापन सुधारणा करणे तसेच आपत्कालीन सेवा अधिक सक्षम आणि तत्पर करणे हे त्यांच्या कामाचे प्रमुख उद्दिष्ट असेल. शहरातील दैनंदिन अडचणी सोडवून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा आपला मुख्य हेतू असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
























































