छत्तीसगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामअवतार जग्गी यांच्या हत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा मुलगा अमित जोगी याला छत्तीसगड उच्च न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अमित जोगी हाच हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे न्यायालयाने म्हटले. जग्गी यांची वर्ष 2003मध्ये रायपूरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या वेळी अजित जोगी हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री होती. या प्रकरणी सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला होता. सीबीआयने आरोपपत्रात अमित जोगी हा प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा केला होता. सत्र न्यायालयाने वर्ष 2007मध्ये इतर आरोपींना शिक्षा सुनावत अमित जोगीला मात्र निर्दोष मुक्त केले होते. याविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ती वर्ष 2011मध्ये उच्च न्यायालयाने विलंब झाल्याचे कारण देत फेटाळली. यावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर उच्च न्यायालयाला निर्देश देत खटला चालवण्याचे निर्देश दिले.
























































