अकासा एअर आणि स्पाईसजेटची विमाने एकमेकांना धडकली; दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सींग करत असताना स्पाईसजेटच्या विमानाची अकासा एअरच्या विमानाशी टक्कर झाली. या धडकेत दोन्ही विमानांचे नुकसान झाले आहे. सध्या दोन्ही विमाने ग्राऊंड करण्यात आली आहेत. विमानतळावरील टॅक्सीवे वर ही घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुरूवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास विमानतळाच्या ‘टर्मिनल 1’ जवळ ही घटना घडली. अकासा एअरचे QP-1406 हे विमान दिल्लीहून हैदराबादसाठी उड्डाणासाठी टॅक्सीवेवरून पुढे सरकत होते, तर स्पाईसजेटचे विमान पार्किंग स्टँडच्या दिशेने जात होते. स्पाईसजेटचे विमान लेह येथून दिल्लीला दाखल झाले होते. यादरम्यान, दोन्ही विमानांचे पंख एकमेकांना धडकले.

दोन्ही एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 16 एप्रिल 2026 रोजी, दिल्ली विमानतळावर टॅक्सींग करत असताना स्पाईसजेटच्या B737-700 या विमानाचे पंख अकासा एअर लाइन्सच्या विमानाला धडकले. या अपघातात विमानाच्या उजव्या बाजूचे विंगलेट खराब झाले. खबरदारीचा उपाय म्हणून स्पाईसजेटचे विमान दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आले आहे.

अकासा एअरनेही एक निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली आहे. 16 एप्रिल 2026 रोजी, दिल्लीहून हैदराबादला जाणारे अकासा एअरचे QP-1406 हे विमान बे परिसरात उभे असताना, त्याची स्पाईसजेटच्या विमानाशी टक्कर झाली. अपघातानंतर सर्व प्रवासी आणि कर्मचारी यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. प्रवाशांना हैदराबादला पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.